झीनत अमान यांनी सोशल मीडिया वर एक पोस्ट शेअर करत 'डॉन' चित्रपटातील जगप्रसिद्ध गाणं 'खाईके पान बनारसवाला' संदर्भात मोठा खुलासा केला आहे. झीनत अमान यांनी सांगितलं की, 'खाईके पान बनारसवाला' हे गाणं मुळात 'डॉन'साठी बनवलेलं नव्हतं. खरं तर हे गाणं देव आनंद यांच्या 'बनारसी बाबू' चित्रपटासाठी तयार करण्यात आलं होतं. मात्र त्या चित्रपटातून ते नाकारलं गेलं. 'डॉन'चे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांनी त्यानंतर हे गाणं आपल्या चित्रपटात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितलं की, 'शूटिंगच्या शेवटच्या टप्प्यात दिग्दर्शकांना वाटलं की मध्यंतरानंतर काही हलके आणि मनोरंजक क्षण असायला हवेत. त्यामुळेच या गाण्याचा समावेश करण्यात आला.'
गाणं शूट करण्याचा अनुभव शेअर करताना झीनत अमान यांनी लिहिलं, 'हे गाणं शूट करायला बराच वेळ लागला. अमिताभ बच्चन यांनी या गाण्यासाठी किती पान खाल्ले असतील याचा काही पत्ताच नाही. त्यांनी सेटवर नेहमीच ऊर्जा आणली. त्यांच्या सोबत काम करताना आनंद मिळाला.'
अमिताभ बच्चन यांच्या उंचीबद्दल गंमतीशीर आठवण शेअर करत त्यांनी म्हटलं, 'त्यावेळी ते दोन प्रमुख अभिनेत्यांपैकी एक होते जे माझ्यापेक्षा जास्त उंच होते (5 फूट 8 इंच). त्यामुळे मला गाण्यासाठी उंच शूज घालावे लागले. हा अनुभव अतिशय मजेदार होता.'
'खाईके पान बनारसवाला' गाण्याचं शूट पूर्ण झाल्यावर ते प्रेक्षकांमध्ये सुपरहिट ठरलं. झीनत अमान यांच्या मते, 'हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की लोक खास थिएटरमध्ये हे गाणं पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा यायचे. हे गाणं संपूर्ण देशभरात वाजू लागलं. त्या काळात माध्यमांमध्ये अशा बातम्या होत्या की प्रेक्षक फक्त या गाण्यासाठी चित्रपट पाहायला येत होते.'
2006 साली फरहान अख्तर याच्या 'डॉन' रिमेकमध्येही हे गाणं शाहरुख खान आणि प्रियंका चोप्रावर चित्रित झालं. झीनत अमान म्हणाल्या, 'रिमेकमधील गाणंही आमच्याचं गाण्यासारखं ऊर्जा आणि उत्साहानं भरलेलं होतं. मात्र, मूळ गाण्याचं स्थान वेगळंच आहे.'
गाणं, चित्रपट आणि त्याच्या आठवणींवर बोलताना झीनत अमान आनंदाने म्हणाल्या, 'खाईके पान बनारसवाला' हे गाणं खरोखरच एक स्मरणीय अनुभव होता. आज मी स्मृतींमध्ये हरवून गेले. तुम्हीही कधी कधी जुन्या आठवणींना उजाळा द्या. बुद्धीचं कुलूप उघडलं जावो'
गाणं बनण्यामागची कथा:
'खाईके पान बनारसवाला' हे गाणं एका छोट्या अपघातासारखं चित्रपटात समाविष्ट झालं, पण त्याने इतिहास घडवला. किशोर कुमार यांच्या आवाजाने आणि कल्याणजी-आनंदजी यांच्या संगीताने सजलेल्या या गाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीत एक वेगळीचं छाप सोडली. झीनत अमान यांनी शेवटी म्हटलं की, 'एखाद्या छोट्या भूमिकेमुळे किंवा गाण्यामुळे तुम्हाला कायमस्वरूपी स्थान मिळू शकतं. हेच गाणं त्याचं उदाहरण आहे.'
आजही हे गाणं बॉलिवूडच्या आयकॉनिक गाण्यांपैकी एक मानलं जातं. झीनत अमान यांचा हा खुलासा चाहत्यांसाठी नक्कीच एक अनोखी आठवण ठरली आहे.