मुंबई : ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या अभिनेता सलमान खान याच्या 'भारत' या आगामी चित्रपटासाठी अनेकांनीच मेहनत घेतली. मुळात एका चित्रपटाच्या यशामागे अनेकांचे कष्ट आणि त्यांचं मोलाचं योगदान असतं हेच या चित्रपटाशी निगडीत एक व्हिडिओ पाहता लक्षात येत आहे. अशाच प्रकारचं योगदान सलमानच्या 'भारत' या आगामी चित्रपटाचा सेट आणि चित्रपटातील काही दृश्यांमधीलस गतकाळ साकारण्यासाठी देण्यात आलं. चित्रपटाच्या टीमकडून याविषयीचा एक व्हिडिओही शेअर करण्यात आला.
भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची सुरुवात होते. त्यामुळे २१ व्या शतकात १९४० चा काळ साकारणं हे चित्रपटाच्या टीमसाठी खरंतर एक मोठं आव्हान. पण, ही तर खरी कला आहे. असं म्हणण्याचं कारण आहे, 'भारतच्या मेकिंगदरम्यानचा एक व्हिडिओ. गतकाळातील दृश्य साकारण्यासाठी दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी बरेच बारकावे टीपले. मग ते त्या काळात वापरात असणारी वेषभूषा असो, रेल्वेगाड्या असो, किंवा निर्वासित आणि फाळणीमध्ये अडकलेल्यांसाठी उभारण्यात आलेली तात्पुरती राहण्याची सोय असो. एक संपूर्ण काळच या चित्रपटासाठी उभा करण्यात आला.
'भारत'च्या निमित्ताने हे आव्हान पेलण्यासाठी मदत झाली ती म्हणजे जुन्या काळातील काही छायाचित्रांची मोठी मदत झाली. ज्या माध्यमातून अगदी रेल्वे स्थानकांची बांधणी, घरांची रचना इत्यादी गोष्टींचा अंदाज घेण्यास चित्रपटाच्या टीमला मदत झाली. 'भारत'चे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांच्याच प्रयत्नांनी अखेर टप्प्याटप्प्यावर येणाऱ्या या आव्हानांना कलेच्या बळावर तोंड देत चित्रपट पूर्णत्वास नेण्यात आला.
सलमान खानची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून अभिनेत्री कतरिना कैफ आणि दिसा पटानीही झळकणार आहेत. त्याशिवाय सुनील ग्रोव्हर, जॅकी श्रॉफ हे कलाकारही 'भारत'च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती अतुल अग्निहोत्री, अलविरा अग्निहोत्री, भूषण कुमार, क्रिष्ण कुमार यांच्या 'रील लाईफ प्रोडक्शन' आणि सलमान खान फिल्म्स अंतर्गत करण्यात आली आहे. 'टी सीरिज' सादर करत असणारा हा चित्रपट सलमानच्या इतर चित्रपटांचा विक्रम मोडणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.