'स्वदेस' फेम 'कावेरी अम्मा'चं निधन

वृद्धापकाळामुळे त्यांचं निधन 

Updated: Feb 19, 2020, 08:36 AM IST
'स्वदेस' फेम 'कावेरी अम्मा'चं निधन  title=
स्वदेस

मुंबई : कलाविश्वात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री किशोरी बल्लाळ यांचं १८ फेब्रुवारी (मंगळवार) रोजी बंगळुरू येथे निधन झालं. वृद्धापकाळामुळे त्यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे. आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 'स्वदेस' या चित्रपटात किशोरी बल्लाळ यांनी साकारलेली 'कावेरी अम्मा' ही भूमिका त्यांना हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्ये आणि एकंदरच प्रेक्षकांच्या वर्तुळात विशेष ओळख देऊन गेली. 

आशुतोष गोवारिकर यांनी ट्विट करत किशोरी बल्लाळ यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं. प्रामाणिक आणि प्रेमळ व्यक्तीमत्त्वासाठी तुम्ही कायम स्मरणात राहाल. त्याशिवाय स्वदेसमधील तुम्ही साकारलेली कावेरी अम्मा ही भूमिकाही स्मरणात राहील, असं ट्विट गोवारिकर यांनी केलं. 

१९६०मध्ये प्रदर्शित झालेल्या  Evalentha Hendthi या चित्रपटातून किशोरी बल्लाळ यांनी चित्रपट विश्वात पदार्पण केलं होतं. त्या एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगनाही होत्या. 'काही', 'हानी हानी', 'सूर्यकांती', 'कॅरी ऑन मराठा', 'अय्या' आणि 'लफंगे परिंदे' या चित्रपटातून त्या झळकल्या होत्या.  

वाचा : शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'

'स्वदेस' या चित्रपटातून अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत झळकलेल्या किशोरी बल्लाळ यांना प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळालं. चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटूनही या चित्रपटाप्रती प्रेक्षकांचं कुतूहल काही कमी झालेलं नाही. ज्याप्रमाणे शाहरुखने या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती त्याचप्रमाणे कावेरी अम्मा साकारणाऱ्या किशोरी बल्लाळ यांचाही यात महत्त्वाचा वाटा होता.