मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेला आज १० वर्ष पूर्ण झाली आहेत. २८ जुलै २००८ पासून सुरु झालेला हा शो गेली १० वर्ष प्रेक्षकांना हसवण्याचे काम इमानेइतबारे करत आहे. या मालिकेची खासियत म्हणजे यातील प्रत्येक पात्राचे खास वैशिष्ट्य आहे. यातील एक लक्षवेधी पात्र म्हणजे बापूजी, चंपक चाचा. अर्थात चंपकलाल जयंतीलाल गडा. अभिनेता अमित भटने हे पात्र साकारले असून त्याने स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. मालिकेत धोतर, चश्मा, काठी घेऊन वावरत असलेले चंपक चाचा मुळात फक्त ४३ वर्षांचे आहेत. जाणून घेऊया चंपक चाचा उर्फ अभिनेता अमित भटबद्दल...
# मुळचे कच्छचे असलेले अमित भट गुजराती कलाकार आहेत. सध्या ते मुंबईत आपल्या कुटुंबासोबत राहतात. पत्नी आणि जुळी मुले असा त्यांचा परिवार आहे. तारक मेहता.. या मालिकेपूर्वी ते गुजराती नाटकांमध्ये काम करायचे.
# मालिकेत बापूजींची भूमिका साकारताना त्यांना जरा अधिकच कष्ट घ्यावे लागतात. भूमिकेची गरज म्हणून त्यांना दर दोन दिवासांनी केस कापावे लागतात. सुरुवातीच्या दोन वर्षात त्यांनी २५० हुन अधिक वेळा केस कापले आहेत. जेव्हा मालिकेत त्यांच्यासाठी विशेष विग आले. तेव्हा त्यांची टक्कर करुन घेण्यापासून सुटका झाली.
# अमित भट यांनी कॉलेज जीवनापासूनच अभिनयाला सुरुवात केली. अनेक गाजलेल्या गुजराती नाटकांमध्ये त्यांनी काम केले आहे. नाटकात काम करत असताना त्यांना तारक मेहता का उल्टा चश्मा या गुजराती कादंबरीवर आधारित मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.
# एका मुलाखतीत अमित भट म्हणाले होते, सुरुवातीला ही भूमिका साकारणे माझ्यासाठी मुळीच सोपे नव्हते. मात्र एक आव्हान म्हणून मी ते स्वीकारले. त्यानंतर मला त्या भूमिकेची सवयच झाली. मुलांसोबत खेळणे, स्वतः पेक्षा वयाने मोठ्या लोकांना रागावणे, हे करताना धमाल यायला लागली.