श्रीदेवीच्या निधनानंतर मेकअप आर्टिस्ट सुभाषने दिला आठवणींना उजाळा

श्रीदेवी यांच्या निधनानंतर कलाकारांबरोबरच सामान्य नागरिकांनी देखील हळहळ व्यक्त केली. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 26, 2018, 06:30 PM IST
श्रीदेवीच्या निधनानंतर मेकअप आर्टिस्ट सुभाषने दिला आठवणींना उजाळा  title=

मुंबई : श्रीदेवी यांच्या निधनानंतर कलाकारांबरोबरच सामान्य नागरिकांनी देखील हळहळ व्यक्त केली. 

अभिनेत्री सुपरस्टार श्रीदेवी यांचं असा गूढ मृत्यू प्रत्येकालाच चटका लावून जाणारा आहे. अशावेळी श्रीदेवीसोबत गेली 10 वर्षे मेकअप आर्टिस्ट सुभाष शिंदे काम करत होते. आता अखेरच्या या दुबईतील कार्यक्रमात देखील सुभाष शिंदे श्रीदेवी यांच्यासोबत होते. त्यांनी श्रीदेवी यांच्या चार कार्यक्रमात चार वेळा मेकअप केला. त्यावेळी श्रीदेवी यांच्या चेहऱ्यावर कुठेही थकवा किंवा एक प्रकारचं आजारपण दिसत नव्हता. आणि अवघ्या काही तासांत सुभाष शिंदे यांना श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी समजली. जी त्यांच्यासाठी अतिशय धक्कादायक होते. 

सुभाष शिंदे यांनी आठवणींना दिला उजाळा 

सुभाष शिंदे यांनी श्रीदेवीच्या निधनानंतर एक कोलाज शेअर केला आहे. ज्यामध्ये श्रीदेवीसोबतचे त्यांचे फोटो आहेत. सुभाष शिंदे यांनी म्हटलं आहे की, श्रीदेवी यांच्या निधनानंतर आपली आई हरपली अशी खंत व्यक्त केली आहे.  मोहित मारवाहच्या चार दिवसांच्या लग्न समारंभातही श्रीदेवी यांचा मेकअप सुभाषनेच केला होता. श्रीदेवी यांचे शनिवारी निधन झाले. सुभाष अगदी शुक्रवारपर्यंत त्यांच्यासोबत होता. पण, पुढच्या एका दिवसात होत्याचं नव्हतं होणार आहे याची पुसटशी कल्पनाही तेव्हा कोणाच्या मनात नव्हती. त्यामुळे हा त्याच्यासाठीसुद्धा एक धक्काच होता.

माझी सिनेसृष्टीतली हक्काची आईच मला कायमची सोडून गेली

‘मुंबईला यायला निघालो तेव्हा त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याचे किंवा आजारी वाटत असल्याचे कोणतेच भाव नव्हते. नेहमीप्रमाणे त्यांनी सांभाळून जाण्याचा सल्ला दिला. तसेच मुंबईत पुढील कार्यक्रमांच्या तारखा निश्चित असल्यामुळे त्यांनी लवकर भेटण्याचं आश्वासनही दिलं. पण त्यांचं ते मायेचं बोलणं शेवटचं असेल असं स्वप्नातही वाटलं नाही. गेल्या 10 वर्षांपासून आमचा सहवास होता. त्या माझ्या एखाद्या आईसारखीच काळजी घ्यायच्या. परदेशात गेल्यावर माझी राहण्याची योग्य सोय झाली की नाही, याबद्दल त्या पहिल्यांदा चौकशी करायच्या. श्रीदेवींच्या अशा आकस्मित जाण्याने माझे व्यक्तिगत खूप नुकसान झाले. हे असं नुकसान आहे जे आयुष्यभर भरून निघू शकत नाही. माझी सिनेसृष्टीतली हक्काची आईच मला कायमची सोडून गेली,’ असे सुभाष यांनी भरलेल्या अंत:करणाने सांगितले. या आठवणींनी सुभाष शिंदे यांचं मन भरून येत आहे. यापुढे काय हा प्रश्न देखील सुभाष शिंदे यांना सतावत आहे.