सलमानच्या चाहत्याकडून बॉलिवूड गायिकेला जीवे मारण्याची धमकी

सलमानचे चाहते....

Updated: May 29, 2019, 04:16 PM IST
सलमानच्या चाहत्याकडून बॉलिवूड गायिकेला जीवे मारण्याची धमकी  title=

मुंबई : विविध मुद्द्यांवर परखडपणे आपली मतं मांडण्यासाठी काही सेलिब्रिटी ओळखले जातात. यामधीलच एक नाव म्हणजे गायिका सोना मोहापात्रा हिचं. सोनाने नुकतच सलमान खानवर निशाणा साधला होता. प्रियांका चोप्राने 'भारत' या चित्रपटातून काढता पाय का घेतला याविषयी त्याने एक वक्तव्य केलं होतं. त्याच्या याच वक्तव्यावर सोनाने नाराजी व्यक्त केली होती. 

ट्विट करत तिने याविषयी आपली प्रतिक्रिया लिहिली होती. 'कारण प्रियांका चोप्रा हिच्या आयुष्यात करण्यासाठी बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. फिरण्यासाठीही काही चांगली मंडळी आहेत. मुख्य म्हणजे तिच्या या प्रवासातून अनेक महिला प्रेरित होतात', असं ती म्हणाली. दुसऱ्या एका ट्विटमधून तिने सलमानवर निशाणा साधला. 

Live audience fuels me like nothing else, says Sona Mohapatra

'सलमानचे चाहते प्रियांका आणि निकच्या वयामध्ये असणाऱ्या अंतरावरुन त्यांची खिल्ली उडवत आहेत. पण, ते हे मात्र विसरत आहेत की, त्यांच्या आवडत्या अभिनेत्याची त्याच्याहून वयाने २० वर्षे लहान असणाऱ्या मुलीशी  जवळीक आहे', असं म्हणत तिने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. खिल्ली उडवणाऱ्या मंडळींनी त्यांच्या विचारसरणीत बदल करण्याचीही आवश्यकता आहे. 

भाईजान सलमानवर टीका केल्यानंतर चाहत्यांनी लगेचच सोनावर तोफ डागल्याचं पाहायला मिळालं. एका चाहत्याने तर सोनाला जीवे मारण्याची धमकीही दिली. ज्याचा स्क्रीनशॉट सोनाने सोशल मीडियावर शेअर केला. ज्यामध्ये त्या चाहत्याने नेमकी काय धमकी दिली, हे स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. 'आता यापुढे सलमान खानविरोधात काही वाईट बोललात तर, मी घरात घुसून तुम्हाला मारेन. ही पहिली आणि शेवटची तंबी आहे', या शब्दांत सोनाला धमकावण्यात आलेलं. 

सोनाने याविषयी माहिती देत 'गैरवर्तणुकीच्या हिरोच्या चाहत्यांकडून मला असे धमकीचे मेल येतात', असं म्हटलं होतं. सेलिब्रिटींच्या या वादात चाहत्यांनी त्यांच्या मर्यादा ओलांडून थेट सेलिब्रिटींनाच असं धमकावण्याचे हे प्रकार थांबण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया आता काही नेटकऱ्यांनी केली आहे. कलाविश्वातही याविषयीच्या चर्चांना उधाण आलं आहे. तेव्हा आता आपल्या या चाहत्यांना भाईजान सलमान काही समज देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.