'तुझ्यासाठी नाही तर हिरानींसाठी डंकी पाहायचाय,' चाहत्याच्या कमेंटवर शाहरुखचं मन जिंकणारं उत्तर, 'नेहमी हिरो...'

शाहरुख खानचा आगामी 'डंकी' चित्रपट हा बेकायदेशीरपणे सीमा ओलांडण्यावर आधारित आहे. या पद्धतीला ‘Donkey Flight’ असं म्हटलं जातं.   

शिवराज यादव | Updated: Dec 3, 2023, 03:50 PM IST
'तुझ्यासाठी नाही तर हिरानींसाठी डंकी पाहायचाय,' चाहत्याच्या कमेंटवर शाहरुखचं मन जिंकणारं उत्तर, 'नेहमी हिरो...' title=

'पठाण' आणि 'जवान' चित्रपटानंतर शाहरुख खान आता आपल्या आगामी 'डंकी'च्या निमित्ताने सुपरिहट चित्रपटांची हॅटट्रीक करण्याच्या प्रयत्नात आहे. राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मुन्नाभाई, थ्री इडियट्ससारखे मनोरंजक चित्रपट देणाऱ्या राजकुमार हिरानी यांच्याकडून फार अपेक्षा आहेत. शाहरुख खानसह या चित्रपटात बोमन इराणी, तापसी पन्नी, विकी कौशलही मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणं रिलीज करण्यात आलं आहे. 1 डिसेंबरला चित्रपट सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

डंकी चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख खानने एक्सवरुन चाहत्यांशी संवाद साधला. शाहरुखनने चाहत्यांसाठी प्रश्नोत्तराचं सेशन ठेवलं होतं. यावेळी एका चाहत्याने शाहरुख खानला आपल्याला हा चित्रपट राजकुमार हिरानी यांच्यासाठी पाहायचा आहे असं म्हटलं. त्यावर शाहरुख खानने दिलेल्या उत्तराने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. 

‘Ask SRK’ सेशनदरम्यान एका चाहत्याने म्हटलं की, "मला माफ कर, पण मी डंकी पाहण्यासाठी उत्साही आहे यामाग तू नाही तर राजकुमार हिरानी आहेत". यावर उत्तर देताना शाहरुख म्हणाला की, "हेच योग्य कारण आहे. मीदेखील राजूच्या चित्रपटात दिसण्यासाठी उत्साही आहे. चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. हिरो तर येत जात असतात".

दुसऱ्या एका चाहत्याने विचारलं की “सर चित्रपट पंजाबमध्ये शूट झाला आहे. तुमचे आवडते पंजाबी पदार्थ कोणते आहेत?". यावर त्याने सांगितलं की, "मी पराठे खाल्ले... छोले भटुरेही माझा आवडता पदार्थ आहे.”

एका वापरकर्त्याने विचारलं की “सर तुम्हाला दिल्लीची आठवण येते का? तुमच्या बालपणाबद्दल सांगा ना". शाहरुखने उत्तर दिलं की “मी तर अजून लहानच आहे. माझं बालपण खूप छान होतं आणि मला माझ्या आई-वडिलांची खूप आठवण येते.”

एका युजरने शाहरुखला “सर तुमच्या मते यश म्हणजे काय?” असं विचारलं. त्यावर त्याने उत्तर दिलं की, "यश म्हणजे जीवनातील सर्व लहान गोष्टींचा आनंद घेण्यास सक्षम असणं. तुम्ही घेतलेल्या प्रत्येक श्वासाची प्रशंसा करा. जीवन साजरे करणे म्हणजे यश होय.” तसंच तुमचा भावनिक मुद्दा काय आहे यावर, शाहरुख म्हणाला: "माझ्या अंदाजानुसार माझं कुटुंब .... प्रत्येकासाठी तेच असतं नाही का."

'डंकी' चित्रपट हा बेकायदेशीरपणे सीमा ओलांडण्यावर आधारित आहे. या पद्धतीला ‘Donkey Flight’ असं म्हटलं जातं.