राजदत्त आणि नयना आपटे यांना ‘एसएनएफएफ जीवनगौरव २०२०’

‘सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२०’चा पुरस्कार सोहळा नुकताच देवगड येथील कंटेनर थिएटर येथे पार पडला. 

Updated: Mar 10, 2020, 05:01 PM IST
राजदत्त आणि नयना आपटे यांना ‘एसएनएफएफ जीवनगौरव २०२०’ title=

देवगड : आमच्यासमोर एकनाथ, नामदेवांचे आदर्श आहेत. समाजाला सुचीत करणं हे कलेचं कर्तव्य असल्याचे ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त म्हणाले.‘सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२०’चा पुरस्कार सोहळा नुकताच देवगड येथील कंटेनर थिएटर येथे पार पडला. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त आणि अभिनेत्री नयना आपटे यांना जीवनगौरव देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कंटेनर थिएटरच्या माध्यमातून केवळ मनोरंजन नव्हे तर समाजप्रबोधन होतंय  ही संकल्पना राज्यातच नव्हे तर देशभरात पोहोचायला हवी असेही ते म्हणाले.

देवगडमध्ये झालेल्या या सोहळ्याला अभिनेते विजय पाटकर, अनिल गवस, अभिनेत्री शितल शुक्ल, रमा नाडगौडा, दिग्दर्शक प्रसाद तारकर, संतोष पाठारे, कला प्राध्यापक डॉ.गणेश चंदनशिवे यांना कलागौरव देऊन सन्मानित करण्यात आले. 

'एसएनएफएफ २०२०' च्या यशाचे सर्व श्रेय कला दिग्दर्शक सुमीत पाटीलला द्यायला हवे..एक संकल्पना मी मांडली ती त्याने प्रत्यक्षात उतरवली. आज देवगडबद्दल सर्वांच्या मनात आकर्षण झालंय..आज असंख्य देशांमध्ये चित्रपटांच्या माध्यमातून बदल घडतायत. हा बदल आता माझ्या देवगडमध्ये होतोय अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी यावेळी दिली.

अनेक सेलिब्रिटी आज देवगडमध्ये येतायत..कंटेनर थिएटर इथे आणल्यापासून जवळपास २ वर्षे झाली..गावातून लोकं इथे सिनेमा पाहायला येतात. चित्रपट शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावा हा उद्देश असल्याचे ते म्हणाले.

सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून ५ ते ८ मार्च दरम्यान कंटेनर थिएटरमध्ये लघुचित्रपट दाखविण्यात आले. या लघुचित्रपटांचे पुरस्कार देखील यावेळी प्रदान करण्यात आले. मिलिंद विसपुते दिग्दर्शित ‘सिल्वत’ सर्वोत्तम लघुपट म्हणून गौरविण्यात आले. ओमकार दामले दिग्दर्शित ‘वन्स ही डिड अ टिनएज पेंटींग’ ही दुसऱ्या स्थानी राहीली. 

‘शेवंती’ लघुपटासाठी निलेश कुंजीर तर ‘लाल होता दराखत’साठी देवकन्या ठाकूर यांना सर्वोत्तम दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले. सर्वोत्तम सामाजिक विषयात साहील शिरवळकर दिग्दर्शित ‘मुक्तीपर्व’ लघुपटाने बाजी मारली तर सिद्धेश वाडकर दिग्दर्शित ‘चाहत’ दुसऱ्या स्थानी राहीली.
तुषार रनावरे दिग्दर्शित ‘कन्यादान’ लघुचित्रपटासाठी जयवंत वाडकर यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा तर मिलींद विस्पुते दिग्दर्शित ‘अंजली जोगळेकर’सिनेमासाठी अंजली जोगळेकर यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

रामेश्वर झिंजुर्डे दिग्दर्शित ‘सॅलिन’साठी अशोक देवकर तर साहील शिरवळकर दिग्दर्शित ‘मुक्तीपर्व’साठी मैथिली पटवर्धनला सर्वोत्तम बालकलाकार म्हणून गौरविण्यात आले. 

अमोल आगवले दिग्दर्शित ‘टी १’ ला सर्वोत्तम पर्यावरण विषयक उमेश काकणे दिग्दर्शित ‘आदत’ला सर्वौत्तम सामाजिक विषयासाठी पुरस्कार देण्यात आला.

अनिल केसी दिग्दर्शित ‘उप्पलम’ हा ज्युरी मेन्शन लघुचित्रपट ठरला. 

सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिव्हल दरम्यान ‘४८ तासात लघुचित्रपट’ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गौरव रेळेकर दिग्दर्शित ‘चॅटर बॉक्स’- माणूस ह्यो गोड हाय आणि पराग सावंत आणि तुषार घाडीगावकर दिग्दर्शित मॅन्ग्रोव्हस ला अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक देण्यात आले.