मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान स्टारर 'थ्री इडियट्स' चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. तब्बल १० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने चाहत्यांच्या मनात घर केले. आज देखील या चित्रपटाबद्दलची क्रेझ चाहत्यांच्या मनात कायम आहे. '३ इडियट्स' फक्त भारतात प्रदर्शित करण्यात आला नव्हता, तर उत्तर कोरिआ, चीन, जपानमध्ये देखील हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.
आताच्या स्पर्धेच्या युगात कशा प्रकारे पालक मुलांवर करियरबद्दल दबाव टाकतात याचं उत्तम उदाहरण देण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती.
जपानमध्ये एका चित्रपटगृहाला टाळे लावण्याआधी रूपेरी पडद्यावर '३ इडियट्स'चं चित्रीकरण करण्यात आलं होतं. ओसाका असं या चित्रपटगृहाचं नाव आहे. काही कारणांमुळे हा चित्रपटगृह कायमचा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्विटरच्या माध्यमातून आयोजकांनी ही माहिती दिली आहे.
तब्बल १० वर्षांनंतर देखील हा चित्रपट हाऊसफूल ठरला. २०१३ मध्ये दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा '३ इडियट्स' चित्रपट जापानमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हा देखील चित्रपटाने उत्तम कामगिरी केली होती. २५ डिसेंबर २००९ साली '३ इडियट्स' भारतात प्रदर्शित करण्यात आला होता.