सायली संजीव नव्या भूमिकेत, मराठी चित्रपट 'काया'चं मुंबईत टीझर पोस्टर लाँच!

Entertainment News : ‘काया’ या मराठी चित्रपटात सायली संजीव सुपर लेडी कॉपची भूमिका साकारणार आहे.

Updated: Oct 7, 2023, 09:15 PM IST
सायली संजीव नव्या भूमिकेत, मराठी चित्रपट 'काया'चं मुंबईत टीझर पोस्टर लाँच! title=

Mumbai News : महिला केंद्रीत चित्रपट आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून मराठी चित्रपटसृष्टीत हा एक मोठा बदल होताना दिसत आहे, अभिनेत्री सायली संजीव मुख्य भूमिकेत असलेल्या "काया" या चित्रपटाची घोषणा मुंबईत टीझर पोस्टर लाँच करून करण्यात आली. मराठी जगतातील अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत या चित्रपटाची अनाऊंसमेंट ,टीझर आणि पोस्टर मुंबईत लाँच करण्यात आले.

यावेळी अभिनेत्री सायली संजीव, माधुरी पवार, सचिन बांगर, अभिनेता अक्षय वाघमारे यांच्यासह निर्माता अक्षय येटाळे, दिग्दर्शक तुषार झगडे, संगीतकार अमित राज उपस्थित होते. ही कहाणी आहे निर्भीड आणि निडर महिला पोलीस अधिकारी कायाची. काया ही एक धाडसी महिला पोलीस आहे, जी अत्यंत हुशारीने केसेस सोडवते. या चित्रपटात काया 7 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या दीपक नावाच्या मुलाचे प्रकरण सोडवत आहे. हे प्रकरण खूप गूढ आहे  त्या बेपत्ता मुलाचे गूढ काया आणि तिची टीम सोडवत आहेत. हा चित्रपट थ्रिलर कृती आणि सत्य घटनावर आधारित आहे. मुलगा दीपक बेपत्ता झाल्यानंतर एक दिवस मुलगा घरी परतेल या आशेने संजय देवकर हे वृद्ध वडील 7 वर्षांपासून पोलिस स्टेशनच्या फेऱ्या मारत आहेत. या प्रकरणादरम्यान, वेगवेगळे संशयित काया च्या आजूबाजूला फिरत आहेत, ज्यामुळे प्रकरण अधिक गोंधळले आहे.

यावेळी निर्माता अक्षय येटाळे म्हणाले, "काया हा मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात आधुनिक अॅक्शनपट असेल. आम्ही या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट तांत्रिक तज्ञांना नेमले आहे. चित्रपटात उच्च दर्जाचे अॅक्शन सीन आणि वेगळी ट्रीटमेंट दाखवण्यात येणार आहे. चित्रपट मुंबईत चित्रीकरण होणार असून, हैदराबाद, गोवा आणि औरंगाबादमध्येही याचे चित्रीकरण होणार आहे. चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक तुषार झगडे म्हणाले, "मराठी चित्रपटसृष्टीला कायाच्या भूमिकेतून एक नवीन महिला सुपर कॉप मिळणार आहे. थ्रिलर आणि मर्डर मिस्ट्रीसोबतच हा चित्रपट मराठी मनोरंजन विश्वात एक नवा मैलाचा दगड रचणार आहे.

अभिनेत्री सायली संजीव उत्साहाने म्हणाली, "जेव्हा निर्मात्याने मला माझ्या व्यक्तिरेखेबद्दल सांगितले, तेव्हा ते मला खूप नवीन वाटले. मी पहिल्यांदाच अशी अॅक्शन पॅक्ड व्यक्तिरेखा साकारत आहे. हे माझ्यासाठी आव्हानात्मकही असेल. ह्या चित्रपटाच्या माध्यमातून मी पोलिसांच्या भूमिकेला प्रेझेंन्ट करत आहे.

"काया" हा चित्रपट अद्विक मुव्ही क्रिएशन्सच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात सायली संजीव, माधुरी पवार, सचिन बांगर, अक्षय वाघमारे हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.चित्रपटाचे निर्माते अक्षय येटाळे असून लेखक दिग्दर्शक तुषार झगडे आहेत. पटकथा आणि संवाद अंबर हरप यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन अमित राज यांनी केले आहे आणि छायाचित्रकार प्रकाश कुट्टी, कार्यकारी निर्माता सचिन बांगर आणि संपादक संजय सांकला आहेत. "काया" हा चित्रपट मे 2024 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.