मुंबई : सचिन पिळगांवकर यांचं ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’हे गाणं यूट्युबवरून काढून टाकण्यात आलं आहे. या गाण्यावरून सचिन पिळगांवकर यांना ट्रोल करण्यात येत होतं. सचिन पिळगांवकर यांनीच हे गाणं म्हणलं असून या गाण्यात ते डान्स करतानाही दिसले होते. गाण्याचे शब्द, संगीत चित्रिकरण विनोदी असल्यामुळे हे गाणं ट्रोल झालं. 16 ऑगस्टला शेमारू बॉलीगोली या यूट्युब अकाऊंटवरून हे गाणं अपलोड करण्यात आलं होतं. या गाण्याची शब्दरचना मोहम्मद अकील अन्सारी यांची आहे. तर व्हिडीओ आणि नृत्य दिग्दर्शन डीसी द्रविड यांनी केलं आहे. पाच मिनिटांच्या या व्हिडिओवर लाईक्सपेक्षा डिसलाईक्सचीच संख्या जास्त होती.
मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नागरिक राहतात. मुंबई शहर जबरदस्त आहे. याच शहराची वैशिष्ट्य या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न केल्याचं डिस्क्रिप्शन या व्हिडिओमध्ये देण्यात आलं होतं.
दरम्यान सचिन पिळगांवकर यांनी या गाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. फेसबूकवर सचिन पिळगांवकर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
नमस्कार मित्रांनो!
नुकताच social media वर release झालेला माझा एक video बर्याच चर्चेचा विषय झाला. काहिंना हसू आलं काहींना मात्र रडू आलं. ज्यांना माझ्या विषायीच्या प्रेमापोटी असं रडू आलं, त्यांना मी नक्कीच उत्तर देणं लागतो.
एवढंच सांगेन की तुम्हाला जसं वाईट वाटलं, तसं मलाही वाटलं. परंतु, विश्वास ठेवा, मी हा व्हिडियो एकाही रुपयाच्या लालसेमुळे किंवा दुसर्या कुठल्याही प्रलोभना मुळे केला नव्हता. आम्ही कलाकार मंडळी बर्याचदा फार त्रास न घेता, जाता जाता कुणा मित्राची मदत होत असेल तर करत असतो. कधी कुणाच्या दुकानाचं उद्घाटन कर, तर कधी एखाद्या ध्वनिफितिचं अनावरण कर...वगैरे...
काही वर्षांपूर्वी एका अशाच मझ्या costume designer मित्राला मदत करण्याच्या उद्देश्याने हे गाणं माझ्यावर shoot केलं गेलं. सेट वर गेल्यावर काही क्षणातच मला होत असेलली गडबड कळाली. परंतु, स्वत: दिग्दर्शक असल्यामुळे दुसर्याच्या कामात दखल देणे हे आजवर कधीच जमले नाही. स्वत: निर्माताही असल्यामुळे आयत्या वेळी सेट सोडून गेल्यास होणार्या नुकसाना बद्दलही माहिती होती, म्हणून तेही करवलं नाही. काही प्रसंगं मी करणार नाही असंही सांगीतलं, जे दुसर्यावर करण्यात आले.
पुढे जेव्हा जेव्हा तो मित्र भेटला आणि व्हिडियो रिलिज होऊ शकत नसल्या बद्दल नाराज दिसला, तेव्हा मनाच्या कोपर्यात होत असलेल्या आनंदामुळे खूप अपराधिपणाची भावनाही वाटली.. पण, ती आता संपलीये!! कारण, हा व्हिडियो शेवटी रिलिज झालाय.. !!! होनी को कौन टाल सकता है?!!
आज मी कायदेशीर रित्या किंवा कायद्या आडून हा व्हिडियो नक्कीच काढून टाकायला लावू शकतो. परंतु, मी तसं करणार नाही. कारण, माझ्या मित्राचा किंवा आताच्या निर्मात्यांचा .. कुणाचाही ‘हेतू’ काही वाईट करण्याचा नव्हता, ह्याची मला खात्री आहे. मग, केवळ आपली आवड त्यांच्यावर लादण्या इतकी लोकशाहिची गळचेपी मी कशी करु?
सरते शेवटी एवढंच सांगेन.. की चूक असती तर माफी मागून “पुन्हा करणार नाही” म्हटलं असतं. पण, एखाद-दुसर्या अशा कटू अनुभवामुळे मित्रांसाठी चांगुलपणा दाखवायची ‘चूक’ करणे मी नक्कीच थांबवणार नाही. मग, तुम्ही आणि मी काय करु शकतो? एवढंच.. की अशा परिस्थितीत मी पुन्हा पडू नये म्हणून देवाजवळ प्रार्थना!!
तेवढी तुम्ही (माझे हीतचिंतक) नक्की कराल याची मला खात्री आहे.
आपला
सचिन पिळगांवकर