मुंबई : बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक अडचणींचा, संकटांचा सामना केला आहे. परंतु बिग बींनी सर्व संकटांवर यशस्वी मात केली. अमिताभ बच्चन 11 जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं असून त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आजपासून 38 वर्षांपूर्वी जुलै महिन्यातच बिग बी 'कुली' चित्रपटादरम्यान जखमी झाले होते.
1982 मध्ये 'कुली'च्या शूटिंगगवेळी अमिताभ बच्चन जखमी झाले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. संपूर्ण देश त्यांच्यासाठी तेव्हादेखील प्रार्थना करत होता. यातून पूर्णपणे बरे होत अमिताभ बच्चन पुन्हा कामाला लागले होते. आता 38 वर्षांनंतर बिग बी कोरोनामुळे रुग्णालयात दाखल झाले असून संपूर्ण देश त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहे.
1982 साली बंगळुरुच्या जवळपास 'कुली'चं शूटिंग सुरु होतं. अभिनेते पुनीत इस्सर आणि बिग बी यांच्यात फायटिंग सीन सुरु होता. अचानक बिग बींच्या पोटात लागलं आणि त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना मुंबईत आणण्यात आलं. मुंबईत त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यांची तब्येत अतिशय नाजूक असल्याचं बोललं जात होतं. कित्येक महिने अमिताभ यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु बिग बींनी यावर मात केली. बरे झाल्यानंतर त्यांनी 'कुली'चं शूटिंग पूर्ण केलं होतं. 'कुली' बॉक्सऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता.
बिग बी बरे झाल्यानंतर 'कुली' चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये काही बदल केल्याचंही बोललं जातं. आधीच्या स्क्रिप्टनुसार बिग बी यांनी साकारलेल्या पात्राचा मृत्यू होतो, परंतु बिग बी शूटिंगवेळी जखमी झाल्यानंतर दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये बदल केला होता. मनमोहन देसाई यांनी, ज्या हिरोने खऱ्या आयुष्यात मृत्यूला हरवलं आहे, अशा हिरोचा चित्रपटात मृत्यू होताना दाखवणं योग्य नसल्याचं ते म्हणाले होते.
1982 मध्ये बिग बी आजारी असताना, लाखो लोकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती. अनेक चाहत्यांनी मंदिरात पाठ-पूजादेखील केली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधीदेखील बिग बींना भेटण्यासाठी गेल्या होत्या. आज पुन्हा एकदा बिग बींना कोरोनाची लागण झाल्यामुळे, संपूर्ण देश बिग बींच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहे.