मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्रीत रणवीर आणि दीपिकाची जोडी सातत्याने चर्चेत असते. आतादेखील एका बातमीमुळे हे दोघेजण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहेत. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी २०१८ मध्ये लग्न केले होते. मात्र, रणवीर सिंगने सध्या दीपिका पदुकोण राहत असलेल्या इमारतीत फ्लॅट भाड्याने घेतला आहे. यासाठी रणवीर सिंगला महिन्याला लाखोंची रक्कम चुकती करावी लागत आहे.
प्रभादेवीच्या ब्लू मोंट या इमारतीच्या २६ व्या मजल्यावर दीपिका पदुकोणचा 4BHK फ्लॅट आहे. दीपिकाने २०१० साली १६ कोटींना हा फ्लॅट विकत घेतला होता.
मात्र, आता रणवीरनेही या इमारतीत फ्लॅट घेतल्याचे समजते. नोंदणी विभागाकडे असलेल्या माहितीनुसार रणवीरने तीन वर्षांसाठी हा फ्लॅट भाड्याने घेतला आहे. पहिल्या दोन वर्षात फ्लॅटचे भाडे ७.२५ लाख रुपये इतके असेल. तर शेवटच्या वर्षात फ्लॅटचे भाडे ७.९७ लाख इतके असेल.
दरम्यान, लग्नानंतरही दीपिका आणि रणवीर आपल्या कामात बिझी आहेत. दीपिका पदुकोणचा छपाक हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिने अॅसिड हल्ल्यातील पीडितेची भूमिका साकारली आहे. येत्या १० तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
तर रणवीर सिंगचा आगामी ८३ हा चरित्रपटही आतापासूनच चर्चेचा विषय आहे. हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याच्या कथानकावर आधारित आहे. यामध्ये रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत दिसेल. तर दीपिका रोमी देव यांच्या भूमिकेत पाहायला मिळेल.