मुंबई : दादरच्या किर्ती कॉलेजमधून "बॅचलर ऑफ मास मीडिया"ची पदवी घेताना अभिनयाचं स्वप्न पाहणारा पृथ्विक प्रताप लवकरच नेटफ्लिक्सवर झळकणार आहे. मराठमोळा अभिनेता पृथ्विक प्रताप शाहरूख खानच्या आगामी वेबफिल्म 'क्लास ऑफ ८३' मध्ये दिसणार आहे. नेटफ्लिक्सवरील १७ नवीन सिनेमांची घोषणा झाली या यादीत पृथ्विकचाही सिनेमा आहे.
गेल्यावर्षी या सिनेमानिमित्त एक फोटो आला की, तुमचे फोटो आमच्याकडे आले आहेत. ऑडिशनला या. सुरूवातीला हा मस्करी वाटली. पण नंतर त्यामागचं गांभीर्य लक्षात आलं. रेड चिलिजच्या या पहिल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सिनेमात आपण काम करत असल्याचा आनंद निराळाच होता, असं पृथ्विक सांगतो.
'क्लास ऑफ ८३' या वेबफिल्ममध्ये मी जनार्दन सुर्वे ही व्यक्तीरेखा साकात आहे. या सिनेमात १९८३ सालची जी बॅच शिकत होती. त्यामधील ५ महत्वाचे एन्काऊंटर स्पेशलिस्ट यांच्यावर आधारित ही वेबफिल्म आहे. यामधील जनार्दन सुर्वे ही व्यक्तीरेखा पृथ्विक साकारत असल्याचं सांगतो.
विजय सिंह हे कॅरेक्टर अभिनेता बॉबी देओल साकारत आहेत. तसेच या सिनेमात आणखी दोन मराठी कलाकार आहेत. समीर परांजपे, अक्षय टंकसाळे देखील यामध्ये दिसणार आहेत. तसेच यामध्ये बॉबी देओल, अनुप सोनी, भूपेंद्र जाडावत, निनाद महाजनी, हितेश भोजराज यामध्ये आहेत.
'बॅकबेंजर्स' या वेबसिरीजमधून सोशल मीडिया चर्चेत आलेला पृथ्विक आता मोठ्या प्लॅटफॉर्मवर झळकताना दिसणार आहे. अभिनयाची आवड असणाऱ्या पृथ्विकने आतापर्यंत अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांत केलं आहे. त्याचप्रमाणे 'आंबट गोड', 'जागो मोहन प्यारे', 'हम बने तुम बने' या मराठी मालिकांमध्येही त्याने महत्वाची भूमिका निभावली आहे.
सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा पर्व २’ या कार्यक्रमात पृथ्विकने सहभाग घेतला होता आणि तो दुस-या पर्वाचा विजेता देखील ठरला. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं माझ्या जीवनात खूप मोलाचं स्थान आहे. अगदी सिनेमाचं शुटिंग सुरू होईपर्यंत मी याचा भाग होता. या टीममधील सगळ्यांनीच मला खूप सांभाळून घेतलं असं पृथ्विक सांगतो.
किर्तीत असताना अनेक स्वप्न उराशी बाळगणाऱ्या पृथ्विकने भरारी घ्यायला सुरूवात केली आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.