नवी दिल्ली : रिलीजच्या आधीच वादग्रस्त ठरलेल्या संजय लीला भंसाळींच्या 'पद्मावती'साठी आणखी एक वाईट बातमी येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिनेमाची रिलीजची तारीख अजून पुढे जाऊ शकते.
दरम्यान 'पद्मावती' सिनेमाच्या विरोधात शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) चित्तोडगड किल्ला, राजस्थान येथे नारेबाजी तसेच प्रवेशबंदी करण्यात आली. सिनेमामध्ये ऐतिहासिक तथ्यामध्ये काही बदल करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
"आम्ही १० वाजल्या पासून चित्तोडगड किल्ल्याचे द्वार बंद केले आहे. या गडावर जाण्यास कोणालाही परवानगी दिली नाही. हे शांततापूर्ण आंदोलन असून ६ वाजेपर्यंत केल्याचे सर्व सामाज विरोध समितीचे सदस्य रणजित सिंग यांनी सांगितले.
करणी सेनेचे सदस्य महिपाल सिंह मकरानाने एक व्हिडिओ जारी करून सांगितलं की, राजपूत कधीही महिलांवर हात उगारत नाही. पण गरज पडली तर आम्ही दीपिकासोबत ते करु. लक्ष्मणने शूर्पनखासोबत जे केलं होतं ते आम्ही तिच्यासोबत करू.
'पद्मावती' हा सिनेमा १ डिसेंबर पासून सिनेमाघरांत दिसणार होता. पण वादात अडकल्याने हा "पद्मावती" पुढील वर्षी १२ जानेवारीला रिलीज होण्याची दाट शक्यता आहे. सेंसॉर बोर्डाने अद्याप 'पद्मावती' सिनेमा पाहिला नसल्याने ही तारीख पुढे गेल्याचे म्हटले जात आहे.
श्री राजपूत करणी सेनेने एक डिसेंबरला भारत बंद करण्याची धमकी दिली आहे. याआधी दीपिका पादुकोनचं नाक कापण्याची धमकी त्यांनी दिली होती. ‘पद्मावती’ रिलीज होत असलेल्या दिवशीच करणी सेनेने भारत बंदचा इशारा दिला आहे. करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कलवी म्हणाले की, पद्मावतीला विरोध करण्यासाठी एक डिसेंबरला भारत बंद केला जाईल.
केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी ट्विट करून म्हटले की, सिनेमाची कथा लिहितना लोकांच्या भावनांचा विचार करायला हवा होता. जर आपण पद्मावतीच्या सन्मामाचं बोलतो तर महिलेचा सन्मान झाला पाहिजे. सिनेमातील कलाकारांचा अपमान चुकीचा आहे.