हेमंत ढोमेसोबत चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी, कसं आणि कुठे द्याल ऑडिशन?

हेमंत ढोमेकडून सुरु असलेले हे ऑडिशन नक्की कोणत्या चित्रपटासाठी आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Updated: Mar 23, 2024, 04:18 PM IST
हेमंत ढोमेसोबत चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी, कसं आणि कुठे द्याल ऑडिशन?  title=

Hemant Dhome Upcoming Movie Auditions : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून हेमंत ढोमेला ओळखले जाते. 'झिम्मा', 'चोरीचा मामला', 'बघतोस काय मुजरा कर' यांसारख्या एकापेक्षा एक चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे. नाटक, चित्रपट अशा सर्वच माध्यमातून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता हेमंत ढोमेच्या आगामी चित्रपटात काम करण्याची तुम्हालाही संधी मिळणार आहे. 

नवोदित कलाकारांसाठी नामी संधी

एखाद्या चित्रपटात किंवा मालिकेत काम करायला मिळणं हे अनेकांचे स्वप्न असतं. बहुतांश नवीन कलाकार हे चित्रपटात काम करायला मिळेल अशी संधी शोधत असतात. आता हेमंत ढोमेने चित्रपटात काम करण्यासाठी इच्छुक असलेल्यांना संधी उपलब्ध करुन दिली आहे. हेमंत ढोमेने नुकतंच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्याने कास्टिंग कॉल असे म्हणत नवोदित कलाकारांसाठी नामी संधी उपलब्ध करुन दिली आहे. 

हेमंत ढोमेच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नेमकं काय?

आपल्या पुढच्या चित्रपटासाठी आपल्या भागातील कलाकारांसाठी संधी. मंचर, नारायणगाव, जुन्नर, शिरुर या भागातील अनुभवी आणि नवोदित सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष कलाकारांसाठी संधी! शूटींग कालावधी मे-जून. आपले नाव, वय, संपर्क क्रमांक, राहण्याचे ठिकाण या माहितीसकट तुमचे फोटो, ऑडिशन, स्वत:ची माहिती देणारा व्हिडीओ हे सर्व खालील ईमेल आयडीवर पाठवा. direction@chalchitramandalee.com तुमची निवड झाल्यास संपर्क साधला जाईल, असे हेमंत ढोमेने यात म्हटले आहे. 

हेमंत ढोमेने ही पोस्ट शेअर करताना "आपल्या नव्या सिनेमात, आपल्या भागातले चेहेरे झळकणार! आपली माणसं… आपला चित्रपट!" असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्याने केलेल्या या पोस्टवर असंख्य कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. तर काहींनी यावर प्रश्नही विचारले असून हेमंतने याची उत्तरही दिली आहेत. हेमंत ढोमेकडून सुरु असलेले हे ऑडिशन नक्की कोणत्या चित्रपटासाठी आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, हेमंत ढोमेने आतापर्यंत अनेक नाटकात काम केले आहे. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटातून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तो 'जय जय महाराष्ट्र माझा', 'मंगलाष्टक वन्समोअर', 'हुतूतू', 'आंधळी कोशिंबीर', 'काय राव तुम्ही', 'ऑनलाईन बिनलाईन' या चित्रपटात झळकला. त्यानंतर ‘पोश्टर गर्ल’ या चित्रपटात हेमंतने अभिनयासोबतच कथा, पटकथा, संवादलेखनाची जबाबदारी सांभाळली. काही महिन्यांपूर्वी हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा आणि झिम्मा 2 हे दोन्हीही चित्रपट सुपरहिट ठरले.