मुंबई : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. घरोघरी गणरायांच आगमन झालं आहे. मात्र, अभिनेत्री राणी मुखर्जी एका संकटात सापडली आहे. राणीच्या घरी बीएमसी अधिकारी नोटीस घेऊन दाखल झाले आहेत.
अभिनेत्री राणी मुखर्जीला ही नोटीस तिच्या जुहू येथील बंगल्यातील अवैध बांधकामामुळे देण्यात आली आहे. राणी मुखर्जीच्या 'कृष्णाराम' या बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप आहे.
काही दिवसांपूर्वी बीएमसी अधिका-यांची एक टीम राणी मुखर्जीच्या घरी गेली होती. राणीच्या बंगल्यात झालेल्या अनधिकृत बांधकामाची तपासणी करण्यासाठी ही टीम दाखल झाली होती. मात्र, बंगल्यावर उपस्थित लोकांनी त्यांना आत प्रवेश दिलाच नाही.
या प्रकारामुळे आता बीएमसीची टीम ३० ऑगस्ट रोजी पोलिसांना घेऊनच बंगल्यात प्रवेश करतील अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
एका अॅक्टिव्हिस्टने अनधिकृत बांधकामाविरोधात बीएमसीमध्ये तक्रार दाखल केली होती. नियमांच उल्लंघन करत राणी मुखर्जीने आपल्या बंगल्यात बांधकाम केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासंदर्भात तक्रार दाखल होताच बीएमसीने एका आठवड्यात नोटीस दिली आणि निरीक्षणासाठी दाखल झाले. मात्र, बीएमसी अधिका-यांना बंगल्यात प्रवेशच मिळाला नाही.