मुंबई : राजस्थानमधील जोधपूर शहर विधानसभा या परिसरातील रातानाडा पीडब्ल्यूडी चौराहा अथं असणाऱ्या एका हॉटेलमध्ये धक्कादायक घटना घडली. हॉटेल लाँर्ड इन, असं या हॉटेलचं नाव असून, तेथील सातव्या मजल्यावरून एका मॉडेलनं उडी मारत जगण्याचा प्रवास संपवण्याचा प्रयत्न केला.
जगण्याच्या संघर्षापुढे गुनगून उपाध्याय या म़ॉडेलनं हात टेकले असले तरीही तिला नशिबानं मात्र तिला जगण्याची आणखी एक संधी दिली.
तिनं उंचावरून उडी मारली खरी, पण जमिनीवर न पडता ती तिथे असणाऱ्या एका कारवर पडली. यामध्ये तिला गंभीर दुखापत झाली आहे.
सदर घटनेनंतर लगेचच तिला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केलं. जिथे तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले.
सध्या या मॉडेलची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. गुनगूनच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एका तरुणाविरोधात आयटी अॅक्ट, धमकी आणि इतर काही कलमांअंतर्गत तक्रार दाखल केली.
सदर तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणातील तपास सुरु केला. सूत्रांच्या माहितीनुसार या तरुणाच्या धमकीमुळं त्रस्त होऊन गुनगूननं जगणं संपवण्याचा निर्णय घेतला होता. पण, सुदैवानं ती बचावली.