जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच त्याला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. जोधपूरच्या न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. या निकालानंतर सलमान खान जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये रवाना झाला आहे.
१९९९साली हम साथ साथ है चित्रपटाच्या शूटिंगवेळी काळवीटाची शिकार करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये सलमान खान बरोबरच सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि निलम या अभिनेत्यांविरोधातही खटला चालला. पण या कलाकारांना संशयाचा फायदा मिळाला. या कलाकारांविरोधात सबळ पुरावे नसल्यामुळे त्यांची सुटका करण्यात आली.
आसाराम बापूच्या शेजारीच सलमान खानला ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. लहान मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आसाराम बापूवर आहे.
ही शिक्षा सुनावल्यानंतर सलमान खाननं जोधपूरच्या सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर न्यायालय शुक्रवारी निर्णय देणार आहे. सलमानला शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाच्या बाहेर बिश्णोई समाजानं जल्लोष केला तर सलमानच्या समर्थकांनी नारेबाजी केली. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून नागरिकांना तिकडून हटवलं.
खटल्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वात आधी सलमान खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, असे न्यायालयाने विचारले. त्यावेळी मी निर्दोष आहे, असे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी सलमान भावूक झाला होता.
सलमान खानला शिक्षा सुनावल्यानंतर सलमानची बहीण अलबिराला रडू आल्याचं सांगण्यात येत आहे. सलमान खानच्या बहिणी त्यांच्या विषयी अधिक भावनिक आहेत. आज सलमानबरोबर बहिणी दिसल्या, पण भाऊ दिसत नव्हते, पण एकूणच सलमान खानला मोठा दिलासा आहे.