बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) अनेक मोठे अभिनेते आणि दिग्दर्शकांसह चित्रपट नाकारले आहेत. यामध्ये शाहरुख, सलमान, अक्षय कुमार अशा अनेक मोठ्या अभिनेत्यांचा समावेश आहे. कंगना रणौत सध्या मुलाखतींच्या माध्यामातून यावर जाहीरपणे भाष्य करत असून यामागील कारणं सांगत आहे. नुकतंच 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या निमित्ताने कंगनाने आपल्याला अक्षय कुमारसह (Akshay Kumar) अनेक चित्रपटांची ऑफर करण्यात आली होती, मात्र आपल्याला या भूमिका योग्य वाटल्या नाहीत असा खुलासा केला आहे. आपण अक्षय कुमारला यामागील कारणं सांगितली होती असंही तिने म्हटलं आहे.
कंगनाने NBT ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, अक्षय कुमारने आपल्याला 'सिंग इज ब्लिंग' चित्रपटाची ऑफर दिली होती. या चित्रपटात अॅमी जॅक्सन लीड भूमिकेत होती. मी अक्षयला माझी भूमिका महिलांचा आदर करणारी नाही असं सांगितलं होतं.
"अक्षय कुमारने मला 'सिंग इज ब्लिंग' चित्रपटासाठी फोन केला होता. यानंतरही त्याने अनेक वेळा मला फोन केला. यानंतर त्याने मला तुला माझ्याशी काही समस्या आहे का? अशी विचारणा केली. मी म्हटलं की, 'सर, मला काहीच समस्या नाही'. यावर त्याने मग का? असं विचारलं होतं. मी तुला इतक्या चांगल्या भूमिका देत असल्याचं त्याने म्हटलं. त्यावर मी सांगितलं की, तुम्ही समजून घ्या. तुम्हाला एक मुलगी आहे. आपल्याला महिलांशी प्रामाणिक राहायला हवं".
कंगनाने दुसऱ्या एका मुलाखतीत सलमान खानसह 'बजरंगी भाईजान' आणि 'सुलतान' चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचा खुलासा केला होता. तिने सिद्दार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, कबीर खानने दिग्दर्शित केलेल्या 'बजरंगी भाईजान' चित्रपटातील भूमिका तितकी ताकदीची वाटली नाही. तसंच 'सुलतान' चित्रपटातील भूमिकाही योग्य वाटली नाही असं कंगनाचं म्हणणं आहे. अखेर या चित्रपटात सलमानसोबत अनुष्का शर्माला घेण्यात आलं होतं.
कंगना म्हणाली की, "सलमान खानने मला बजरंगी भाईजानमध्ये भूमिकेची ऑफर दिली होती. ही काय भूमिका आहे? असं मला वाटलं होतं. यानंतर त्याने मला सुलतानसाठी विचारणा केली. मी तेदेखील नाकारलं. यानंतर आता मी आणखी काय ऑफर देऊ शकतो असं त्याचं झालं होतं". पण नी इतक्यांदा नकार दिल्यानंतरही सलमान खान आपल्याशी नेहमीच चांगला वागला असंही तिने सांगितलं.
याच मुलाखतीत कंगनाने रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटावर विनाकारण हिंसा दाखवल्याबद्दल टीका केली होती. "ते फक्त मृतदेहांचे खच करत आहेत. कशाला? फक्त मजेसाठी. जनतेच्या कल्याणासाठी किंवा सीमेच्या रक्षणासाठी नाही. फक्त ड्रग्ज ध्या आणि मजा करा," अशी टीका तिने केली होती.