Entertainment News : साहसपट असो किंवा थरारपट, कोणत्याही प्रकारच्या चित्रपटानध्ये भूमिका साकारणाऱ्या एका अभिनेत्याचं विशेष कौतुक. कारण, आतापर्यंतच्या कारकिर्दीत या अभिनेत्यानं अशा काही भूमिका साकारल्या, अशी पात्र जीवंत केली त्या पात्रांचा चाहत्यांनीही तिरस्कार केला. एखादं खलनायकी पात्र तो अभिनेता इतक्या ताकदीनं साकारून गेला की अनेकदा मुख्य भूमिकेतील अभिनेत्यांनाही काही क्षणांसाठी त्या पात्राला हेवा वाटला.
भूमिका लहान असल्या तरीही त्या प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतील अशाच होत्या आणि याच भूमिकांच्या बळावर या अभिनेत्यानं कमालीची प्रसिद्धी मिळवली. वडिलांचं टेलरिंगचं दुकान, दिल्लीतून सुरु झालेल्या या अभिनेत्याच्या संघर्षाला खरं यश मिळालं ते म्हणजे संजय दत्तच्या पहिल्यावहिल्या चित्रपटातून. अर्थात 'रॉकी'मधून.
संजूबाबासोबतच बॉलिवूडमध्ये झळकलेला हा अभिनेता म्हणजे सुनील सिकंदरलाल कपूर; चित्रपटात मिळालेल्या खलनायकी भूमिकेमुळं खुद्द संजय दत्तनंच या अभिनेत्याला वेगळं नाव दिलं आणि हेच नाव त्याची ओळख बनून राहिलं. हा अभिनेता दुसरातिसरा कोणी नसून, तो आहे शक्ती कपूर.
आतापर्यंतच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये 700 हून अधिक भूमिका आणि त्यातही बहुतांशी नकारात्मक भूमिकांमध्ये झळकून शक्ती कपूरनं एकदोन नव्हे तर तब्बल 45 कोटी रुपये इतकी गडगंज संपत्ती उभी केली. ‘राजा बाबू’, ‘बाप नंबरी बेटा दस नंबरी’, ‘अंदाज अपना-अपना’, ‘तोहफा’, ‘चालबाज’ हे त्याचे काही गाजेलले चित्रपट.
जाणून आश्चर्य वाटेल, पण शक्ती कपूरची पत्नी शिवांगी कोल्हापूरे आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या कुटुंबातं एक खास नातं. ज्यामुळं शक्ती कपूरची लेक, अभिनेत्री श्रद्धा कपूर ही लतादीदींना आजी संबोधते. श्रद्धाच्या आईचे वडील पंडित पंढरीनाथ कोल्हापूरे आणि लता दीदी ही भावंडं. त्यामुळं श्रद्धा कपूरची आई ही लता मंगेशकर, आशा भोसले यांची भाची. आहे की नाही हे खास नातं....