'काहे दिया' फेम ऋषी बॉलिवूडच्या तयारीत ?

‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता ऋषी सक्सेनाच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 7, 2017, 08:16 PM IST
'काहे दिया' फेम ऋषी बॉलिवूडच्या तयारीत ? title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता ऋषी सक्सेनाच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अमराठी असलेल्या ऋषीने आपल्या गोड हसण्याने आणि सशक्त अभिनयाने मराठी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ‘काहे दिया परदेस’ मालिकेनंतर ऋषी कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची उत्सुकता अगदी सगळ्यांच आहे. 

छोट्या पडद्यावर यश मिळवल्यानंतर अनेक कलाकार चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवतात. त्यात बॉलिवूडमध्ये काम करण्याची सर्वच कलाकारांची इच्छा असते. मग ऋषी त्याला अपवाद कसा ठरेल ? मालिका प्रसिद्ध झाल्यानंतर त्याला अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. सध्या ऋषी आपल्या बॉडी आणि लूकसाठी विशेष मेहनत घेत आहे. हे नेमके कशासाठी ? बॉलिवूडमधील पदार्पणासाठी ?

गेल्या काही दिवसांमध्ये ऋषी हिंदी मालिका किंवा वेब सीरीजमध्ये झळकणार असल्याच्याही चर्चा ऐकायला मिळत होत्या. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती ऋषीकडून समोर आलेली नाही. 

आणखी एखाद्या मराठी मालिकेत भूमिका साकारण्याचीही त्याची इच्छा आहे. ”काहे दिया परदेस’सारखा मराठी प्रोजेक्ट परत मिळणं अशक्य नसलं तरी अवघड आहे. मात्र त्याच धाटणीचा एखादा मराठी चित्रपट मिळाला तरी मला तो करायला आवडेल’, असं तो म्हणाला. मात्र सध्या त्याचं सर्व लक्ष बॉलिवूडकडेच लागलं आहे. आपल्या या शिवला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक ही नक्कीच उत्सुक असतील.