Juhi Parmar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जुही परमार ही 'कुमकुम - एक प्यारा सा बंधन' या मालिकेसाठी ओळखली जाते. या मालिकेतील तिची कुमकुम ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. जुही ही सोशल मीडियावर सक्रिय असते. जुही सध्या 'द हॅबिट कोच विथ अशदिन डॉक्टर' या पॉडकास्टमुळे चर्चेत आहे. या पॉडकास्टमध्ये बोलताना जुहीनं 2019 मध्ये तिला आलेला एक अनुभव सांगितला आहे. यावेळी कशा प्रकारे रात्री अचानक तिच्या विंडपाइपमध्ये अन्न अडकले आणि तिला कशा प्रकारे दुसरा जन्म मिळाला हे सांगितलं आहे.
या पॉडकास्टमध्ये जुही परमार तिच्या या संपूर्ण प्रसंगाविषयी सांगताना दिसली. "माझ्यासोबत एक खूप मोठी घटना घडली होती. ही घटना मी इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. मी त्याला माझा दुसरा जन्म म्हणते. कारण 19 मार्च 2019 होळीची रात्र होती. त्या दिवशी मी मेल्यात जमा होते. मी आयसीयूत होते. अन्न माझ्या नाक आणि विंडपाइप म्हणजे श्वास नलीकेत अडकलं होतं आणि त्यामुळे मी श्वास घेऊ शकत नव्हते. ती रात्र माझ्यासाठी खूप कठीण होती", असं जुही म्हणाली.
याविषयी सविस्तर सांगत जुही म्हणाली, "पण त्या रात्री माझ्यात खूप बदल झाले. मला कायम स्वरुपी बदलले. मी एक पुस्तक वाचत होते ज्यात लिहिले होते की ठीक आहे, प्रत्येत दिवशी तुम्हाला अनेक गोष्टी लिहाव्या लागतील, म्हणजेच त्या दिवसात ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या लिहून काढायच्या. मी त्यावेळी माझं घर, करिअर आणि आरोग्याविषयी लिहिले. आता मला अजून काय लिहायला हवं असा विचार करत होते. पण त्या दिवसानंतर ही लिस्ट खूप मोठी झाली."
हेही वाचा : Vijay Devarkonda आणि रश्मिकाच्या घरी लगीन घाई? व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा
जुही पुढे म्हणाली, "सगळ्यात आधी मी श्वास घेते. मी आभारी आहे. मी तुमच्याशी बोलू शकते, त्यासाठी आभारी आहे, मला बोलता येतय, मला जे वाटतय, माझे विचार मी सगळ्यांसमोर मांडू शकते. यासाठी मी आभारी आहे. त्यामुळे ही लिस्ट खूप मोठी आहे. त्यारात्री माझ्यात खूप बदल झाले. ज्यामुळे मला जाणवलं की तो पर्यंत माझ्याकडे अशा अनेक गोष्टी होत्या ज्यांची मी तक्रार करू शकते. तोपर्यंत माझ्या मनात प्रश्न होते की मीच का पण आता हा प्रश्न मला येत नाही."