Maharashtra Weather News : महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये मागील काही दिवस पावसाचं सावट असल्याचं पाहायला मिळालं. पण, आता मात्र पावसासाठीची पोषक वातावरणाची स्थिती विरली असून, त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा थंडी पाय घट्ट रोवताना जाणवू लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका दिवसागणिक वाढत असून, किमान तापमानातही घट नोंदवण्यात येत आहे.
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये सातारा, पुणे आणि कोल्हापुरातील घाटमाथ्यावरील परिसरामध्ये पुढील 24 तासांमध्ये धुक्याचं प्रमाण वाढणार असून, थंडीचा कडाकाही वाढणार आहे. तिथं नाशिक, निफाड क्षेत्रामध्येही तापमानात रातोरात घट झाल्यामुळं थंडीचा कडाका चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या काळात राज्यात गारठा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला असून, ही थंडी टप्प्य़ाटप्प्यानं संपूर्ण राज्य व्यापताना दिसेल.
राज्यावर मागील दोन दिवसांपासून असणारं पावसाचं सावट आता दूर होताना दिसत असून, काही भागांतून या पावसानं पूर्ण माघार घेतली आहे. ज्यामुळं तापमानात कमालीचा फरक पाहायला मिलत असून, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा आकडा 15 अंशांवर पोहोचला आहे. येत्या काळात राज्याच्या काही भागांमध्ये हा आकडा आणखी कमी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही पहाटेच्या वेळी आणि रात्री उशिरा हवेत गारवा जाणवण्यास सुरुवात झाली असून शीतलहरींनी खऱ्या अर्थानं परिणाम दाखवण्यास सुरुवात केल्याचं स्पष्ट होत आहे.