Balasaheb Thackeray Video Mentioning Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून सर्वच राजकीय पक्ष अगदी जोमाने आज प्रचारासाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळणार आहे. सभा, दौरे, रोड शो, बैठकांबरोबरच सोशल मीडियावरही सर्वच पक्षांचा डिजीटल प्रचार जोरात सुरु आहे. त्यातच महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 साली झालेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग, त्यानंतर अडीच वर्षींनी शिवसेनेत पडलेली फूट पाठोपाठ राष्ट्रवादीत पडलेली उभी फूट यासारख्या गोष्टींमुळे सर्वच पक्ष एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. खास करुन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं काँग्रेसबरोबर जाणं अनेकांना पटलं नसल्याचा दावा भारतीय जनता पार्टीबरोबरच एकनाथ शिंदेंची शिवसेनेकडूनही अनेकदा करण्यात आला. यासाठी बऱ्याचदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या एका जुन्या विधानाचा संदर्भ दिला गेला.
बाळासाहेबांनी एका जाहीर सभेमध्ये काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ आली तर मी माझ्या पक्षाचं दुकान बंद करेन, असं म्हटलं होतं. हेच वाक्य मागील पाच वर्षांमध्ये अनेकदा चर्चेत आल्याचं किंवा ठाकरेंच्या भूमिकेवर टीका करण्यासाठी वापरलं गेलं. मात्र आता बाळासाहेबांनी अन्य एका जाहीर भाषणामध्ये केलेल्या राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांसंदर्भात केलेल्या विधानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बाळासाहेबांच्या 12 व्या स्मृतीदिनी ठाकरेंच्या शिवसेनेनं सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रचंजड व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी शरद पवार आणि आपण सोबत असतो तर काय झालं असतं याबद्दल बोलताना दिसत आहेत. "मी आणि शरद पवार ह्या महाराष्ट्रात एकत्र असतो तर कोणाची टाप नव्हती ह्या महाराष्ट्राकडे वाकड बघण्याची!" असं बाळासाहेबांनी थेट बोट दाखवत विधान केलं होतं. हाच व्हिडीओ बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाने शेअर केला आहे.
मी आणि शरद पवार ह्या महाराष्ट्रात एकत्र असतो तर...
कोणाची टाप नव्हती ह्या महाराष्ट्राकडे वाकड बघण्याची! pic.twitter.com/QbdNF4j45L— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 17, 2024
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार तसेच कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र आव्हाडांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. "महाराष्ट्राच्या राजकारणात देशाला चकित करतील अशा घडामोडी घडतच असतात. त्यात नेत्यांमध्ये अंतर्गत वाद, मित्रपक्षांमध्ये मतभेद, नवनवीन आघाडी-युती निर्माण होणे हा लोकशाहीचाच एक भाग आहे. पण भाजपाने मराठी माणसांनी मराठी माणसांसाठी स्थापन केलेले आणि अनेक दशकं वाढवलेले पक्ष फोडून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती लयाला नेली. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय शरद पवार साहेब यांनी आपापल्या पक्षांचे बळकटीकरण करण्यासाठी खूप परिश्रम घेतले होते. ते स्वकीयांकडूनच फोडून भाजपने महाराष्ट्राचा केलेला अपमान महाराष्ट्राची जनता कधीच विसरणार नाही. आगामी निवडणुकांमध्ये जनता या पक्षफोडीविरोधात आपला कौल देईल आणि महाराष्ट्राचे भवितव्य ठरवेल," असा विश्वास आव्हाडांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात देशाला चकित करतील अशा घडामोडी घडतच असतात. त्यात नेत्यांमध्ये अंतर्गत वाद, मित्रपक्षांमध्ये मतभेद, नवनवीन आघाडी-युती निर्माण होणे हा लोकशाहीचाच एक भाग आहे. पण भाजपाने मराठी माणसांनी मराठी माणसांसाठी स्थापन केलेले आणि अनेक दशकं वाढवलेले पक्ष फोडून… https://t.co/dxLBYnxRsG
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 17, 2024
बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्तच हा व्हिडीओ शेअर करण्यात आल्याने तो चांगलाच व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं.