'जेलर'मधल्या वर्मनला केरळ पोलिसांनी केली अटक; दारुच्या नशेत केलं धक्कादायक कृत्य

Jailor Actor Vinayakan Arrested : रजनीकांत स्टारर 'जेलर'मध्ये खलनायक वर्मनच्या भूमिकेत दिसलेल्या विनायकनला अटक करण्यात आली आहे. केरळ पोलिसांनी विनायकनला अटक केली आहे.

Updated: Oct 25, 2023, 09:21 AM IST
'जेलर'मधल्या वर्मनला केरळ पोलिसांनी केली अटक; दारुच्या नशेत केलं धक्कादायक कृत्य title=

Actor Vinayakan : सुपरस्टार रजनीकांतच्या (rajinikanth) जेलरने (Jailor) बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. या चित्रपटात रजनीकांतचा अप्रतिम अभिनय आणि अ‍ॅक्शन आहे. तर चित्रपटाचा खलनायक वर्मनही खूप चर्चेत होता. वर्मनची भूमिका अभिनेता विनायकनने (Vinayakan) साकारली होती. अभिनेता विनायकने ज्याप्रकारे वर्मनची भूमिका साकारली होती त्यामुळे तो संपूर्ण देशात लोकप्रिय झाला होता. मात्र आता अभिनेता विनायकन अडचणीत आला आहे. जेलर चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला केरळ पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेता विनायकन याला एर्नाकुलम उत्तर पोलिसांनी अटक केली. 

केरळ पोलिसांनी मंगळवारी जेलर चित्रपट अभिनेता विनायकनला अटक केली. दारूच्या नशेत पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याचा आरोप त्याच्यावर होता. मंगळवारी संध्याकाळी त्याच्या अपार्टमेंटमध्ये झालेल्या वादानंतर अभिनेत्याला एर्नाकुलम टाउन नॉर्थ पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावले. याठिकाणी त्याने एकच गोंधळ घातला. पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याने त्याला अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तसेच आवश्यक वैद्यकीय चाचण्यांसाठी त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.

पोलिसांनी सांगितले की, अभिनेता विनायकन सायंकाळी साडेसातच्या सुमारास ठाण्यावर पोहोचला आणि त्याने पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याला काही काळ सहन केले मात्र त्याचे अपमानास्पद वर्तन सुरूच राहिल्याने पोलिसांना त्याच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करावा लागला.

एर्नाकुलम शहर पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस अधिकाऱ्यासह पाच पोलीस दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास श लिंक रोडलगत असलेल्या विनायकन याच्या घरी गेले होते. पत्नीसोबत आर्थिक बाबींवरून झालेल्या कथित भांडणाबद्दल विनायकनने स्वतः पोलीस ठाण्यात फोन केला होता. मात्र, पोलिसांनी येऊन ओळखीचा पुरावा मागितला असता त्याने त्यांच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. मात्र त्यानंतर विनायकन पोलीस ठाण्यात पोहोचला तेव्हा तो दारूच्या नशेत होता. त्याने तिथेही गोंधळ सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी विनायकनला अटक केली.

विनायकन केवळ अभिनेताच नाही तर तो संगीतकार आणि पार्श्वगायकही आहे. तो मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम करतो. विनायकने 1995 मध्ये मॅट्रिकमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण 2016 मध्ये त्यांना कामाठीपद्मासाठी केरळ राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला. त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा हा पुरस्कार मिळाला. या चित्रपटासाठी त्यांनी एक गाणेही तयार केले आहे. 2016 च्या या चित्रपटाने त्याला ओळख मिळवून दिली. पण जेलरने त्याच्या करिअरची दिशा बदलली.