मुंबई : बॉलिवूडमधील कास्टींग काऊचबद्दल अभिनेत्री नेहमीच बिनधास्त बोलताना बघायला मिळतात. अनेक अभिनेत्रींनी याचा खुलासा केलाय की, त्यांना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला.
आता अभिनेत्री कृती सेननने यावर आपलं मत व्यक्त केलंय. ती म्हणाली की, सिने इंडस्ट्रीत कुणीही ‘गॉडफादर’ नाहीये आणि कधीही तिला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला नाही. एका कार्यक्रमात ती यावर बोलत होती.
कृती म्हणाली की, ‘मी अभिनय क्षेत्रात येण्याआधी एक इंजिनिअर होते आणि इंजिनिअरींग क्षेत्रातून अभिनय क्षेत्रात येणं खूप मोठा बदल होता. मला असं वाटायचं की, हे खूप मोठं स्वप्न आहे. मला वाटतं कास्टिंग काऊचसारखं काही नसतं. केवळ बॉलिवूडच नाही तर कुठेही नसते. सुदैवाने मला अजून याचा सामना करावा लागला नाही. मी एका एजन्सीसोबत जोडले गेले आणि माझ्यासोबत असं काहीच झालं नाही’.
बॉडी शेमिंगबाबत कृती म्हणाली की, ‘अपयशाला घाबरू नका. अपयश तुम्हाला मजबूत करतं. कुणालाही हे म्हणण्याची संधी देऊ नका की, तुम्ही हे करू शकत नाही. लोक हिरो आणि व्हिलनबाबतच बोलताना आणि लिहितात. हिरोईनबद्दल जास्त लिहित नाहीत. पण आता या मानसिकतेत बदल होतो आहे. लोक आता महिला प्रधान सिनेमेही पसंत करत आहेत’.