'20 वर्षात सुचित्रा बांदेकरांना किती पैठणी दिल्या?' आदेश बांदेकर म्हणाले...

या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विजेत्या गृहिणीला पैठणी साडी भेट म्हणून दिली जाते. आता अभिनेते आदेश बांदेकरांनी पैठणीबद्दल अनेक किस्से सांगितले. 

Updated: Apr 4, 2024, 03:06 PM IST
'20 वर्षात सुचित्रा बांदेकरांना किती पैठणी दिल्या?' आदेश बांदेकर म्हणाले... title=

Aadesh Bandekar Story About Suchitra Paithani Saree : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं म्हणून अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांना ओळखले जाते. सुचित्रा बांदेकरांच्या  घरातून आदेश बांदेकर आणि त्यांच्या प्रेमाला विरोध  होता. त्यामुळे त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केले. आदेश बांदेकरांनी ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाद्वारे घराघरात ओळख निर्माण केली. आदेश बांदेकर आणि 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाचं एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. या कार्यक्रमाचा पहिला भाग 2004 मध्ये प्रदर्शित झाला. गेल्या 20 वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विजेत्या गृहिणीला पैठणी साडी भेट म्हणून दिली जाते. आता अभिनेते आदेश बांदेकरांनी पैठणीबद्दल अनेक किस्से सांगितले. 

'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाचे सर्वात मोठं आकर्षण म्हणून मानाच्या पैठणी साडीला ओळखले जाते. ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात विजेत्या होणाऱ्या गृहिणीला पैठणी साडी दिली जाते. पैठणी साडीला महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून ओळखलं जाते. आता अभिनेते आदेश बांदेकरांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी 'होम मिनिस्टर' कार्यक्रमातील अनेक किस्से सांगितले. 

"सुचित्रा बांदेकरांना किती पैठण्या दिल्या?"

यावेळी आदेश बांदेकरांना सुचित्रा बांदेकरांबद्दल हटके प्रश्न विचारण्यात आला. गेल्या 20 वर्षांपासून तुम्ही महाराष्ट्रातील घराघरात पैठणी घेऊन जाता, पण मग तुम्ही सुचित्रा बांदेकरांना किती पैठण्या दिल्या, असा प्रश्न आदेश बांदेकरांना विचारण्यात आला. यावर आदेश बांदेकरांनी हटके उत्तर दिले. "सध्या मी सुचित्राला साड्याच घेत नाही. कारण ती थेट मला बिलं आणून दाखवते. कारण पैठणी साडी म्हणजे महाराष्ट्राचं महावस्त्र आहे आणि हीच पैठणी जेव्हा एखाद्या माऊलीच्या अंगावर जाते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं तेज हे खूप मोठं असतं."

"आता ती स्वत: साड्यांची खरेदी करते आणि मला..."

"हेच तेज माझ्या घरातही असावं, असं मला वाटणं फारच स्वाभाविक आहे. त्यामुळे मी स्वत: एक-दोनवेळा तिला पैठणी साडी विकत घेऊन दिली. पण, आता ती स्वत: साड्यांची खरेदी करते आणि मला दाखवते. मी आणि सुचित्राने जेव्हा लग्न केलं तेव्हा तिला काहीही देऊ शकत नव्हतो. पण त्यावेळी मी एक गोष्ट मनाशी पक्की ठरवली होती ती म्हणजे प्रामाणिकपणाच्या जोरावर मी माझी परिस्थिती अशी तयार करेन की, कधीच तुला लेबल पाहून वस्तू विकत घ्यावी लागणार नाही. त्यासाठी आज मला 25 वर्षे मेहनत करावी लागली. आता आमच्या संसाराला एकूण 33 वर्षे पूर्ण झाली आहेत. आपण एकदा स्वच्छ कामाचा मार्ग निवडला की, पुन्हा मागे वळून पाहावं लागत नाही.” असा किस्सा आदेश बांदेकरांनी सांगितला. 

दरम्यान ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय आहे. हा कार्यक्रम सादर करणारे सूत्रसंचालक आदेश बांदेकर हे ‘भावोजी’ म्हणून घराघरात लोकप्रिय झाले आहेत. या कार्यक्रमाने जवळपास 10 लाख किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास, 6000 भाग आणि 12000 घर इतका मोठा पल्ला गाठला आहे. 'दार उघड बये दार उघड' म्हणत सुरु झालेला ‘होम मिनिस्टर’चा कार्यक्रमाने 20 व्या वर्षात पदार्पण केले आहे.