मुंबई : अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'राधे' चित्रपटामध्ये व्यस्त आहे. मीड-डेच्या रिपोर्टनुसार सलमान आणि सह-निर्माते चित्रपटाच्या एका क्लायमॅक्स सीनसाठी तब्बल ७.५ कोटी रूपये खर्च करणार आहेत. चित्रपटाचा हा खर्चिक सीन २० मिनिटांचा असणार आहे. 'राधे' चित्रपटामध्ये सलमानसोबत अभिनेत्री दिशा पटनी देखील भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रभू देवा यांच्या खांद्यावर आहे.
'दबंग ३' चित्रपटानंतर हे त्रिकूट पुन्हा 'राधे' चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करताना दिसणार आहे. सलमानचा हा नवा चित्रपट २०२० रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील तो चाहत्यांना चांगलीच ईदी देणार आहे.
'राधे' चित्रपटाचा हा क्लायमॅक्स सीन साकारण्यासाठी VFX चा वापर करण्यात येणार आहे. जसं बाहुबली भाग १ आणि बाहुबली भाग २ VFX च्या भोवती फिरत होता, तसाचं 'राधे' चित्रपटाचा २० मिनिटांचा भाग देखील VFX भोवती फिरताना दिसणार आहे.
चित्रपटाचा २० मिनिटांचा भाग सलमान आणि अभिनेता रणदीप हुड्डा दोघांवर चित्रित करण्यात येणार आहे. शिवाय हा भाग ऍक्शनने परिपूर्ण असणार आहे. चित्रपटचे काही भाग मुंबईत चित्रित करण्यात आले आहेत. तर काही सीन शूट करण्यासाठी टीम दुबईत जाणार आहे.
त्यामुळे आता चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल झाल्यानंतर चाहत्यांच्या पसंतीस पडतो की नाही हे पाहणे औत्युक्याचं ठरणार आहे.