दुबई : बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा दुबईमध्ये मृत्यू झाला. खलीज टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार श्रीदेवींचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला आहे. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मृत्यू बुडून झाल्याचा दावा खलीज टाईम्सनं केला आहे. श्रीदेवी यांच्या रक्तामध्ये दारूचा अंशही आढळून आला आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर आता श्रीदेवी यांचं मृत्यू प्रकरण सरकारी वकिलांकडे सोपवण्यात आलं आहे.
Dubai Police has transferred the case to Dubai Public Prosecution, which will carry out regular legal procedures followed in such cases: Govt of Dubai Media Office #Sridevi
— ANI (@ANI) February 26, 2018
यूएईमधील वृत्तपत्र खलीज टाईम्सने श्रीदेवी यांच्या आयुष्यात शेवटच्या ३० मिनिटांत नेमकं काय झालं याचं वृत्त दिलं आहे. मृत्युपूर्वी श्रीदेवी यांच्यासोबत काय झालं यासंदर्भात खलीज टाईम्सने वृत्त छापलं आहे.
अभिनेत्री श्रीदेवी यांना सरप्राईज डिनरला नेण्याचा बोनी कपूर यांचा प्लॅन होता. त्यासाठी बोनी कपूर यांनी तयारी केली होती असंही खलीज टाईम्सने म्हटलं आहे.
खलीज टाईम्सने दिलेल्या वृत्तपत्रात म्हटलं आहे की,
- लग्नानंतर परिवारातील अनेक सदस्य भारतात परतले होते.
- शनिवारी रात्री बोनी कपूर श्रीदेवीला सरप्राईज देण्यासाठी दुबईत पोहोचले.
- बोनी कपूर शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता दुबईतील जुमैरा अमिरात टॉवर्स हॉटेलमध्ये दाखल झाले. याच ठिकाणी श्रीदेवी उपस्थित होती.
- हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्यासोबत जवळपास १५ मिनिटे गप्पा मारल्या.
- त्यानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवीला डिनरला बाहेर जायचं असं सांगितलं. मग, श्रीदेवी तयारी करण्यासाठी बाथरुममध्ये गेल्या.
- श्रीदेवी जवळपास १५ मिनिटांपर्यंत बाथरुममधून बाहेर न आल्याने बोनी कपूर यांनी दरवाजा ठोठावला.
- मात्र, कुठलाच प्रतिसाद न आल्याने बोनी कपूर यांनी कसाबसा दरवाजा उघडला.
- बोनी कपूर यांनी बाथरुमचा दरवाजा उघडताच त्यांना एक धक्का बसला. कारण, श्रीदेवी पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये बेशुद्धावस्थेत पडल्या होत्या.
- बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना शुद्धीवर आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. मग, बोनी कपूर यांनी आपल्या मित्राला हॉटेलमध्ये बोलावले. या दरम्यान श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला होता.
- रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
१९६३ मध्ये जन्मलेल्या श्रीदेवी यांनी १९६७ साली एक बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. श्रीदेवीने हिंदीसोबतच तेलुगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळम सिनेमांतही काम केलं आहे. श्रीदेवीला २०१३ साली सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवण्यात आले.