बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांनी नाताळच्या दिवशी पहिल्यांदाच आपली मुलगी राहाचा चेहरा जगाला दाखवला. राहाचा गोड चेहरा आणि निळ्या डोळ्यांवर अनेकजण फिदा झाले आहेत. यानंतर राहा नेमकी कोणासारखी दिसते अशाही चर्चा रंगल्या. दरम्यान, काहींनी ती अगदी आपले आजोबा ऋषी कपूर यांच्यासारखी दिसत असल्याचं मत मांडलं. आपला दावा सिद्ध करण्यासाठी अनेकांना ऋषी कपूर यांचे बालपणीचे फोटोही शेअर केले. दुसरीकडे ऋषी कपूर आज आपल्यात नसल्याने अनेकांनी शोकही व्यक्त केला.
ऋषी कपूर यांचं तीन वर्षांपूर्वी निधन झालं तेव्हा अनेकांचे डोळे पाणावले होते. ऋषी कपूर यांचं जाणं फक्त त्यांचं कुटुंबच नाही तर चाहत्यांसाठीही मनाला चटका लावणारं होतं. त्यामुळेच जेव्हा कधी नीतू कपूर किंवा रणबीर कपूर ऋषी कपूर यांची आठवण काढतात तेव्हा चाहतेही भावूक होतात.
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी आणि त्यातही खासकरुन ऋषी कपूर यांच्यासोबत काम केलेले अभिनेते नेहमीच त्यांची आठवण काढत असतात. दरम्यान नुकतंच जेव्हा रणबीर आणि आलियाने मुलगी राहाचा चेहरा दाखवला तेव्हा पुन्हा एकदा ऋषी कपूर यांच्या आठवणी ताज्या झाल्या. ही आपल्या आजोबांसारखीच दिसत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्रदेखील राहाला पाहिल्यानंतर भावूक झाले आहेत.
धर्मेंद्र सोशल मीडियावर सक्रीय असतात. सोशल मीडियावरुन ते चाहत्यांसोबत जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. सध्या त्यांनी ऋषी कपूर यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Yadon ki yaad jab aa jaati hai !!! https://t.co/DhSIN0jdVl
— Dharmendra Deol (@aapkadharam) December 26, 2023
धर्मेंद्र यांनी जी पोस्ट शेअर केली आहे ती एका चाहत्याने इंस्टाग्रामला शेअर केली आहे. या व्हिडीओत ऋषी कपूर, राहा आणि राज कपूर यांच्या फोटोंचा कोलाज करण्यात आला आहे. तसंच एक वॉइस ओव्हर जोडण्यात आला आहे, जो अभिनेत्याने शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'आठवणींची आठवण जेव्हा येते'.
रणबीर आणि आलियाच्या मुलीचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 रोजी झाला. याचवर्षी तिला एक वर्ष पूर्ण झालं आहे. मुलगी एक वर्षांची झाल्यानंतर रणबीर आणि आलियाने ख्रिस्मसला तिला जगासमोर आणलं. सध्या ते दोघेही मुलीला घेऊन नववर्षं साजरं करण्यासाठी अज्ञात ठिकाणी गेले आहेत.