नवी दिल्ली : चित्रपटसृष्टीतील अनिश्चितता हे अनेकदा सेलिब्रिटींच्या नैराश्याचे कारण ठरते. अनेकदा तर खाजगी आयुष्याच्या वादळांनी त्यात भर पडते. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण मागील काही वर्ष नैराश्यात होती, हा खुलासा खुद्द तिनेच केला होता. फक्त तिचं नव्हे तर या यादीत करण जोहर, शाहरुख खान, हृतिक रोशन अशा अनेक नावांचा समावेश आहे.
दीपिकाने आपण आधीच नैराश्याचा सामना केल्याचे स्पष्ट केलं होतं. मात्र त्याला बराच काळ लोटला. त्यामुळे आता दीपिकाची मानसिक स्थिती सुधारली असेल, अशी अनेकांना आशा होती. पण एका कार्यक्रमात तिने सांगितले की, "मी यातून पूर्णपणे सावरली आहे असे म्हणता येणार नाही. कारण मला परत त्याच परिस्थितीचा सामना करावा लागेल का ? अशी भीती माझ्या मनात सतत असते. कारण तो अनुभव खूप वाईट होता."
आपल्या नैराश्याबद्दल मोकळेपणाने बोलल्यामुळे तुला काही नुकसान झाले का ? असा प्रश्न तिला विचारताच दीपिका म्हणाली की, याबद्दल मी निश्चित काय नुकसान झाले ते सांगू शकत नाही. पण त्यामुळे काही निर्माते माझ्याकडे ऑफर्स घेऊन आले नसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर ती, शालेय अभ्यासक्रमात मानसिक स्वास्थ्य हा विषय शिकवला जावा याचे तिने समर्थन केले. त्यामुळे मानसिक आरोग्याबाबतीत ज्या काही चुकीच्या समजुती आहेत, त्या दूर होतील, असे ती म्हणाली.
संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटात दीपिका झळकणार आहे. हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होईल. चित्रपटात रणवीर सिंह आणि शाहिद कपूर देखील आहेत.