लॉस एंजेलिस : Coronavirus कोरोनाचं थैमान थांबवण्यासाठी जागतिक स्तरावर सध्याच्या घडीला युद्धपातळीवर काम सुरु आहे. अतिशय कठिण अशा या प्रसंगामध्ये अनेक देशांना या वैश्विक महामारीचा फटका बसला आहे. जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा चिंतेत टाकत असतानाच मृतांची वाढती संख्याही परिस्थिती आणखी तणावपूर्ण करत आहे.
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार ग्रॅमी पुरस्कार विजेत्या जॉन प्राईन यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. गीतकार, गायक म्हणून ख्याती असणाऱ्या प्राईन यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. २६ मार्चला त्यांना Nashville येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाची लक्षणं आढळल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
कोरोनावरील उपचार सुरु असतानाच उदभवलेल्या काही अडचणींमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती एका पत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
१० ऑक्टोबर १९४६ ला शिकागो येथे विलियम प्राईन आणि वेर्ना हम्म या मुळच्या केंटकीच्या असणाऱ्या दाम्पत्याच्या कुटुंबात जॉन यांचा जन्म झाला. त्यांनी ओल्ड टाऊऩ स्कूल ऑफ फोल्क म्युझिक येथे संगीताचं शिक्षण घेतलं होतं. प्राईन यांच्या जाण्याने कलाविश्व आणि संगीत प्रेमींनी दु:ख व्यक्त केलं आहे.