मुंबई : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक आणि ज्येष्ठ अभिनेते किशोर कुमार यांची आज 34 वी पुण्यतिथी आहे. 13 ऑक्टोबर 1987 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. आज ते या जगात नसले तरी त्यांची गाणी आणि अभिनय लोकांच्या आजही लक्षात आहेत. लोकं आजही किशोर कुमार यांची गाणी आवडीने ऐकतात. त्यांनी गायलेले प्रत्येक गाणे सुपरहिट होते. त्यांनी चित्रपटातील प्रत्येक प्रकारात आपलं नशीब आजमावलं आणि ते यशस्वी देखील ठरले. याशिवाय किशोर कुमार हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी देखील ओळखले जातात.
चित्रपटाच्या सेट्सपासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत, ते एक अतिशय स्वभाववादी व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. परंतु आपल्यापैकी कमी लोकांनाच त्यांच्या विषयी फारशी माहिती असेल.
किशोर कुमार यांनी त्यांच्या आयुष्यात 4 विवाह केले. परंतु त्यांचे वैवाहिक जीवन फारसे यशस्वी झाले नाही.
1929 मध्ये खंडवा येथे जन्मलेल्या किशोर कुमार यांचे खरे नाव आभास कुमार गांगुली होते, पण त्यांना प्रेमाने गंगोपाध्याय म्हटले जायचे. किशोर कुमार यांनी विविध भाषांमध्ये 1500 हून अधिक गाणी गायली आहेत.
किशोर कुमार यांचे आयुष्यात 4 विवाह झाले. यापैकी फक्त एकच पत्नी लीना चांदर्वकर जिवंत आहे, बाकीचे सर्वजण आता या जगात नाहीत. किशोर यांनी आपलं पहिलं लग्न मधुबालाशी केलं यासाठी त्यांनी आपला धर्म देखील बदलला. पण लग्नानंतर त्यांनी मधुबालाची फसवणूक केली, अशी बातमी समोर आली आहे.
मधुबालाची बहीण मधुर भूषणने एका मुलाखतीत सांगितले होते - जेव्हा मधुबाला आजारी होती आणि आम्ही उपचारासाठी लंडनला जाण्याचा विचार करत होतो. त्या दरम्यान किशोर कुमारने तिला प्रपोज केले. वडिलांची इच्छा होती की, मधुबालाने डॉक्टरांचे मत घ्यावे आणि ती पूर्णपणे बरी झाल्यानंतरच लग्न करावे. पण दिलीप कुमार यांच्याशी झालेल्या फसवणूकीमुळे संतापलेल्या मधुबालाने लगेच किशोर कुमारशी लग्न केले.
मधुर भूषण यांनी सांगितले, "मधूबालाने वयाच्या 27 व्या वर्षी 1960 मध्ये लग्न केले. पण ती जास्त दिवस जगू शकणार नाही, असे डॉक्टरांनी सांगताच किशोर कुमार यांनी मुंबईतील कार्टर रोड येथे एक बंगला विकत घेतला आणि तिला तेथे नर्स आणि ड्रायव्हरसह सोडले. ते चार महिन्यातून एकदा मधूबालाला भेटायला द्यायचे. त्यांनी मधुबालाचा फोन उचलणेही बंद केले. त्याने मधुबालाचा विश्वासघात केला. तो चांगला नवरा नव्हता."
किशोर कुमारच्या कारकिर्दीची सुरुवात फारशी विशेष नव्हती. त्यांना गायनात करिअर करायचे होते, पण त्यांच्या मोठ्या भावाची इच्छा होती की, त्यांनी अभिनय करावे. या दुविधेत त्यांचे सुरुवातीचे चित्रपट फ्लॉप ठरले. कारण त्याला अभिनयात अजिबात रस वाटत नव्हते. तसेच, त्यांना गाण्यात संधी मिळत नव्हती.
एक वेळ अशी आली की, त्यांचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. पडद्यावर लोकांना त्याची मस्त शैली आवडायला लागली. यानंतर किशोर यांनी अभिनयात रस घ्यायला सुरुवात केली. मग त्यांना गाण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
किशोर कुमार यांच्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी असे होते, जे त्याला इतरांपासून वेगळे ठेवत होते. पैशाच्या बाबतीतही किशोर कुमार यांचे ठाम मत होते. त्यांचा एकच फंडा होता, 'नो पैसे नो वर्क', ते काम सुरू करण्यापूर्वीच कामाचे सर्व पैसे घेत असत.
13 ऑक्टोबर हा दिवस दोन्ही भाऊ अर्थात किशोर कुमार आणि अशोक कुमार यांच्याशी जोडला गेला आहे. 13 ऑक्टोबरला किशोरचा मोठा भाऊ अशोक कुमारचा जन्म दिवस आणि याच दिवशी किशोर कुमार यांचे वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले.