मुंबई : कलाविश्वात सेलिब्रिटी हे त्यांच्या कलाकृतींसोबतच आणखी एका कारणामुळेही अनेकांच्याच गळ्यातील ताईत होतात. ते कारण म्हणजे या कलाकारांना असणारी फॅशनची समज. झगमगणाऱ्या या विश्वात कलाकार मंडळी विविध कार्यक्रमांच्या अनुशंगाने अनुक एका कार्यक्रमाला साजेशी वेशभूषा करतात. अभिनेता रणवीर सिंग आणि त्याची पत्नी, अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचं असंच रुप नुकत्याच पार पडलेल्या २०व्या आयफा पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळालं.
सेलिब्रिटी फॅशन डिझायनरकडून काहीतरी वेगळ्या आणि तितक्याच कल्पक डिझाईन्सना प्राधान्य देत प्रत्येक कलाकाराचं रुप आयफाच्या रेड कार्पे़टवर पाहायला मिळालं. पण, यातही चर्चेत राहणारी जोडी ठरली ती म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणची.
यंदाच्या आयफासाठी रणवीरने राखाडी रंगाच्या सूटला पसंती दिली होती. या लूकमध्ये जोड होती ती म्हणजे अतिशय कलात्मकपणे गुंडाळेल्या लाल सॅटीन कापडाची. हा लूक अधिक उठादार करण्यासाठी रणवीरने कानात रिंग, गळ्यात चैन घातली होती. तर, डोक्यावर उंच असा पोनी त्याने बांधला होता. हातात काठी आणि काळ्या रंगाचा गॉगल अशा एकंदर अंदाजात तो रेड कार्पेटवर आला आणि बस्स.... छायाचित्रकारांची झुंबडच उडाली.
सोशल मीडियावरही रणवीरने त्याच्या या लूकचे फोटो पोस्ट केले. त्याने काही फोटो पोस्ट करताच काही नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. कोणी त्याला चक्क कबुतरही म्हटलं, तर दुसरं काही मिळालं नाही का? असा प्रश्न उपस्थित करत काहींनी त्याची खिल्ली उडवली.
एकिकडे रणवीरची खिल्ली उडवली जात असतानाच दुसरीकडे दीपिकावरही ट्रोल करणाऱ्यांनी निशाणा साधला.
मेट गालाप्रमाणेच ही इथे येऊ शकत नाही... इथपासून अरेssss... या दोघांना कोणीतरी समजवा.... असं म्हणत तिच्या वेशभूषेवर टीका करण्यात आली. दीपिकाने आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी फिकट जांभळ्या रंगाच्या गाऊनला पसंती दिली होती. ऑफ शोल्डर प्रकारात मोडणाऱ्या या पायघोळ गाऊनमध्ये सुरेख अशा पिसाऱ्याची जोड देण्यात आली होती. ज्यामुळे तो अधिक उठून दिसत होता.