लाल बहादुर शास्त्री यांच्या मृत्युचं रहस्य उलगडणार 'द ताश्कंद फाईल्स'

जय जवान, जय किसानचा नारा आजही तितकाच प्रभावी आणि परिणामकारच   

Updated: Mar 20, 2019, 03:25 PM IST
लाल बहादुर शास्त्री यांच्या मृत्युचं रहस्य उलगडणार 'द ताश्कंद फाईल्स' title=

मुंबई : काही व्यक्ती आणि त्यांचा प्रवास हा त्यांच्या पश्चातही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो. पण, अनेकदा हा प्रवास काही प्रश्नही उपस्थित करतो. जे वर्षानुवर्षे अनुत्तरितच राहतात. अशाच प्रश्नांची उकल करत त्याच्या उत्तरांपर्यंत पोहोचण्यासाठी विवेक अग्निहोत्री एक महत्त्वाकांक्षी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी सज्ज आहे. 'द ताश्कंद फाईल्स', असं या चित्रपटाचं नाव असून, त्यातून स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या निधनाभोवती असणापे काही प्रश्न आणि रहस्य उलगडणार आहे. 

सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरू आहे ती म्हणजे विवेकच्या ट्विटमुळे. १२ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं पोस्टर त्याने पोस्ट केलं आहे. ज्यामध्ये जय जवान, जय किसानचा नारा आजही तितकाच प्रभावी असल्याचं ठळक अक्षरांत लिहिण्यात आलं यावर लाल बहादुर शास्त्रींचा एक फोटोही पाहायला मिळत आहे. आणखी एका पोस्टरमध्ये, 'पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारताच्या पंतप्रधानांचा गूढ मृत्यू', असंही लिहिलेलं पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये एका पोस्टाच्या तिकिटावर शास्त्री यांचा फोटो आहे. त्यामुळे एकंदरच अनेक प्रश्नांची उत्तरं या चित्रपटाच्या निमित्ताने मिळणार हे नक्की. 

११ जानेवारी, १९६६ मध्ये लाल बहादूर शास्त्री यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी ताश्कंदमध्ये अखेरचा श्वास घेतला होता. हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं होतं. पण, त्यांच्या कुटुंबीयांनी मात्र शास्त्रींसोबत दगा झाल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे हा चित्रपट आतापासूनच चर्चेचा विषय ठरत आहे. 'द ताश्कंद फाईल्स'मध्ये अभिनेत्री श्वेता बासू, पंकज त्रिपाठी, पल्लवी जोशी, मंदिरा बेदी, विनय पाठक, नसिरुद्दीन शाह आणि मिथून चक्रवर्ती अशी तगडी स्टारकास्ट झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे.