मुंबई : हिंदी कलाविश्वात ए.आर. रेहमान हा जागतिक ख्यातीप्राप्त संगीतकार आणि गायक म्हणजे जणू एक चमत्कार. रेहमानने संगीतबद्ध केलेल्या गाण्यांची जादू काही औरच. जवळपास दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांना काही अद्वितीय गीतांची मेजवानी देणाऱ्या या संगीतकाराने नुकतंच एका नव्या गाण्याप्रती नाराजी व्यक्त केली आहे.
रेहमानने थेट शब्दांमध्ये नव्हे, तर एका ट्विटच्या माध्यमातून त्याच्या भावना आणि त्याचं मत मांडलं. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं मसक्कली २.० असं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. जे प्रदर्शित होताच लगेचच रेहमानने एक ट्विट केलं. ज्यामधून त्याने स्पष्टपणे नाराजीचा सूर आळवल्याचं पाहायला मिळालं.
शिवाय या नव्या गाण्याच्या तुलनेत त्याने चाहत्यांना 'मसक्कली' हे मुळ गाणं ऐकण्यासही सांगितलं. 'संगीत क्षेत्रातील २०० कलाकार, ३६५ दिवस मेंदूला सातत्याने दिलेला ताण.. हे सारंकाही दीर्घकाळ टीकणाऱ्या संगीत रचऩांसाठी....', असं ट्विट करत रेहमानने त्यासाठी कष्ट घेणारे दिग्दर्शक, कलाकार, संगीतकार, गीतकार या साऱ्यांचाच उल्लेख केला. त्याची ही पोस्ट पाहता अनेकांनीच नव्या गाण्यावरील नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली.
Enjoy the original #Masakali https://t.co/WSKkFZEMB4@RakeyshOmMehra @prasoonjoshi_ @_MohitChauhan pic.twitter.com/9aigZaW2Ac
— A.R.Rahman (@arrahman) April 8, 2020
गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये अनेक गाण्यांचे रिक्रिएटेड व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मुळात यापैकी फार कमी रिक्रिएटेड व्हर्जन असणाऱ्या गीतांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. नव्या रंगात सादर होऊऩ फसलेल्या अशाच काही गाण्यांच्या यादीमध्ये 'मसक्कली २.०'चाही समावेश झाला आहे. फक्त रेहमानच नव्हे, तर चाहत्यांनीही या गीतावर नामराजीचा सूर आळवला आहे.