जान्हवी कपूर, करण जोहर अडचणीत; वायुदलाशी काय आहे कनेक्शन

देशाच्या संरक्षणास तत्पर असणाऱ्या दलानंच....   

Updated: Aug 14, 2020, 02:58 PM IST
जान्हवी कपूर, करण जोहर अडचणीत; वायुदलाशी काय आहे कनेक्शन  title=

मुंबई : बॉलिवूड निर्माता करण जोहर आणि अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या वादाच्या भोवऱ्यात आल्याचं कळत आहे. मुख्य म्हणजे या वादाचं थेट नातं आहे ते म्हणजे वायुदलाशी. देशाच्या संरक्षणार्थ तत्पर असणाऱ्या अमुक एका तुकडीशी काय बरं नातं असावं असाच प्रश्न पडण सहाजिक आहे. 

अभिनेत्री जान्हवी कपूर हिची मुख्य भूमिका असणारा Gunjan Saxena  'गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ज्यानंतर लगेचच भारतीय वायुदलाकडून सेन्सॉर बोर्डाला उद्देशून एक पत्र लिहित त्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. चित्रपटाचा निर्माता असणारा करण जोहर यानं मुळ माहितीची कोणतीही मोडतोड केली जाणार नाही, असं सांगतलं होतं पण वायुदलाचा सूर पाहता करणनं त्याचा शब्द राखलेला नाही असंच स्पष्ट होत आहे. 

'गुंजन सक्सेना...' हा चित्रपट दिशाभूल करत असल्याचं वायुदलाचं म्हणणं आहे. शिवाय या चित्रपटातून वायुदलाची प्रतिमा नकारात्मक दृष्टीकोनातून दाखवण्यात आली असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. चित्रपटातून महिलांच्या प्रती वायुदलाची काम करण्याची पद्धतही चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आली आहे. शिवाय चित्रपटातील काही दृश्य आणि संवादांवर आक्षेप घेत वायुदलानं निर्मिती संस्थेशी (करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनशी) संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणतंही उत्तर आलं नसल्याचं वायुदलाकडून सांगण्यात येत आहे. 

 

पंकज त्रिपाठी, जान्हवी कपूर, अंगद बेदी आणि सहकलाकारांच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाबाबत घेण्यात आलेले हे आक्षेप पाहता आता यावर पुढं चित्रपटाशी संलग्न मंडळी काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. चित्रपटातील पंकज त्रिपाठी यांनी साकारलेल्या वडिलांच्या भूमिकेला विशेष दाद दिली जात आहे.