रणबीरला I love you म्हणणारी आलिया आता म्हणते...

तिने या वक्तव्याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे.   

Updated: Apr 9, 2019, 10:47 PM IST
रणबीरला  I love you  म्हणणारी आलिया आता म्हणते...  title=

मुंबई : अनेक कॅमेरे, असंख्य नजरा आणि कलाविश्वाच्या अपेक्षा या साऱ्यांची तमा न बाळगता अभिनेत्री आलिया भट्ट हिने अगदी अनपेक्षितपणे तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत असणाऱ्या नात्याला तिने दिलखुलासपणे सर्वांसमोर ठेवलं आणि व्हायचं तेच झालं. रणबीर- आलियाच्याच नात्याच्या चर्चांनी जोर धरला आणि पाहता पाहता या चर्चा थेट त्यांच्या लग्नापर्यंत पोहोचल्या. रणबीरसाठी आलियाने जाहीरपणे प्रेम व्यक्त केल्यानंतर आता तिने या वक्तव्याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. 

'ती कोणत्याही प्रकारची घोषणा नव्हती. मला त्यावर काहीच बोलायचं नाही आहे, कारण मी जे काही केलं ते सर्वस्वी अत्यंत खासगी होतं', असं आलिया म्हणाली. आलियाने आपल्या वक्तव्याविषयी दिलेलं हे स्पष्टीकरण पाहता नात्याविषयी होणाऱ्या काही चुकीच्या चर्चांना तिने पूर्णविराम दिला आहे. 

काय म्हणाली होती आलिया? 

फिल्मफेअर २०१९ या पुरस्कार सोहळ्यात राझी या चित्रपटासाठी आलियाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड करण्यात आली होती. त्याचवेळी पुरस्कार स्वीकारल्यांनंतर तिने हे वक्तव्य केलं. 'आजची रात्र ही सर्वार्थाने प्रेमाची आहे. तिथे.... माझी अत्यंत खास व्यक्तीही आहे. आय लव्ह यू रणबीर', असं आलिया म्हणाली होती. तिचं वक्तव्य ऐकल्यानंतर रणबीरच्या चेहऱ्यावरील भावही पाहण्याजोगे होते. 

सध्याच्या घडीला बॉलिवूड विश्वात आलिया- रणबीरच्या नात्याविषयी प्रत्येकाच्याच मनात प्रचंड कुतूहल पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांमध्ये ते दोघं लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे. मुळात रणबीर आणि आलिया या दोघांपैकी कोणीही लग्नाच्या चर्चांना दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे नेमक्या आणि अधिकृत घोषणेकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. तूर्तास बी- टाऊनमधील ही सर्वाधिक लाडकी जोडी येत्या काळात आयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सध्यातरी ते दोघंही या चित्रपटावरच लक्ष केंद्रीत करत आहेत.