ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughn Sinha) जेव्हा यशाच्या शिखऱावर होते, तेव्हा एकाच वेळी त्यांच्या आयुष्यात दोन महिला होत्या. एकीशी त्यांचं लग्न झालं होतं, तर दुसरीसोबत नातं तोडताना त्यांना फार अवघड जात होतं. पूनम सिन्हा (Poonam Sinha) यांच्यासह लग्न करत असल्याची घोषणा झाली तेव्हा शत्रुघ्न सिन्हा आपली सह-अभिनेत्री रिना रॉय (Reena Roy) यांच्याशी प्रेमसंबंधात होते. लग्नाला काही तास शिल्लक असतानाही शत्रुघ्न सिन्हा रिना रॉय यांच्यासह लंडनमध्ये होते. Anything But Khamosh या आपल्या आत्मचरित्रात त्यांनी हा उल्लेख केला आहे. दरम्यान इतक्या वर्षांनी त्यांनी अखेर आपण एकाच वेळी पूनम आणि रिना रॉय यांच्यासोबत नात्यात होतो याची कबुली दिली आहे. तसंच आपल्याला याबद्दल दोषी वाटत असल्याचंही म्हटलं आहे. "प्रेमाच्या त्रिकोणात फक्त महिलाच नाही तर पुरुषांनाही तितकंच सहन करावं लागतं." असं त्यांनी म्हटलं आहे.
Lehren Retro ला दिलेल्या मुलाखतीत, शत्रुघ्न सिन्हा यांना पत्नी आणि रिना रॉय यांच्याशी एकाच वेळी नात्यात असल्यासंबंधी विचारण्यात आलं. मुलाखत घेणाऱ्याने विचारलं की, 'मला भूतकाळातील एक विधान आठवतं जेव्हा तुम्ही मला सांगितलं होते की तुमचे पाय दोन वेगवेगळ्या बोटींमध्ये आहेत. यावर, ते उपहासात्मकपणे म्हणाले “दोन वेगवेगळ्या बोटी? मी म्हणेन, कधीकधी मी अनेक बोटींमध्ये होतो.
पुडे त्यांना सांगितलं की, "मी नावे घेणार नाही. पण, माझ्या आयुष्याचा भाग असलेल्या सर्व महिलांचा मी ऋणी आहे. माझ्या मनात कोणाबद्दलही द्वेष नाही. मी त्यांच्याबद्दल कधीही वाईट विचार करत नाही. या सर्वांनी मला वाढण्यास आणि एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत केली आहे.”
पत्नी आणि रिना रॉय यांच्याशी एकाच वेळी संबंधात होतो हे मान्य करताना त्यांनी सांगितलं की, “माझ्या आयुष्यात माझ्याकडून नक्कीच चुका झाल्या आहेत. पाटण्याहून आलेल्या मुलाचं इंडस्ट्रीतील चकचकीत आणि ग्लॅमरमध्ये हरवून जाणं स्वाभाविक होतं. स्टारडमला कसं सामोरं जावं हे मला माहीत नव्हतं. या सगळ्यात लोक हरवून जातात. मला मार्गदर्शन करण्यासाठी माझ्याकडे कोणी पालक नव्हता. मात्र, पूनम माझ्या आयुष्यात आल्यानंतर तिने मला खूप मदत केली."
प्रेम त्रिकोणात असताना त्यावेळीच्या परिस्थितीवर भाष्य करताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “मला नाव घ्यायचं नाही, परंतु या व्यक्तीसोबत जे काही घडत होतं. मी तिचा ऋणी आहे. मला तिच्याकडून खूप प्रेम मिळालं आहे, खूप काही शिकायला मिळालं आहे. माझी काही तक्रार नाही.”
ते पुढे म्हणाले, “जेव्हा एखादा माणूस मनाने चांगला असतो आणि तो एकाच वेळी दोन वचनबद्ध नातेसंबंध जोडत असतो, तेव्हा त्यालाही त्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या बाबतीत खूप त्रास होतो. तुम्हालाही अपराधी वाटते. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत बाहेर असता तेव्हा तुम्हाला घरात तुमच्या पत्नीसाठी अपराधी वाटतं आणि जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीसोबत असता तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रियकरासाठी वाईट वाटतं. तिला खेळणं बवनून का ठेवलं आहे?’.
त्यांनी नंतर कबूल केलं की, “मला सांगायचं आहे की, प्रेम त्रिकोणामध्ये गुंतलेल्या मुलींनाच त्रास होत नाही तर पुरुषालाही तितकाच त्रास सहन करावा लागतो. त्याची इच्छा असतानाही तो परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी धडपडतो.”
शत्रुघ्न सिन्हा आणि रिना रॉय कालीचरण (1976) च्या सेटवर भेटले. यानंतर मिलाप, संग्राम, सत श्री अकाल आणि चोर हो तो ऐसा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. या चित्रपटांदरम्यान ते एकमेकांच्या जवळ आले.
राजीव शुक्ला यांनी मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांना त्यांच्या निर्णयामागील कारण विचारलं होतं. “तू रीना रॉयवर रोमान्स करत होतास, पण तू पूनमशी लग्न केलेस. का?" यावर, अभिनेता म्हणाला होता, “कधीकधी आयुष्यात, एखादी व्यक्ती अशा टप्प्यावर पोहोचते जिथे निर्णय घेणे खूप कठीण होते. पण एकदा निर्णय घेतला की तो नेहमीच सर्वांच्या बाजूने नसतो.”