"हा अत्यंत धोकादायक ट्रेंड", The Kerala Story च्या यशामुळे नसरुद्दीन शाह चिंतेत; म्हणाले "आपण जर्मनी नाझीच्या दिशेने..."

Naseeruddin Shah on Kerala Story Success: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी 'द केरळ स्टोरी'ला (The Kerala Story) मिळालेल्या यशानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. हा अत्यंत धोकादायक ट्रेंड असल्याचं ते म्हणाले आहेत. हा चित्रपट पाहण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 1, 2023, 07:55 PM IST
"हा अत्यंत धोकादायक ट्रेंड", The Kerala Story च्या यशामुळे नसरुद्दीन शाह चिंतेत; म्हणाले "आपण जर्मनी नाझीच्या दिशेने..." title=

Naseeruddin Shah on Kerala Story Success: बॉक्स ऑफिसवर (Box Office) 'द केरळ स्टोरी'ला (The Kerala Story) मिळालेल्या यशानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींच्या कमाईचा पल्ला गाठला आहे. चार आठवड्यात चित्रपटाने 250 कोटींची गल्ला जमवला आहे. चित्रपटामुळे निर्माण झालेला वाद ही यशामागील एक महत्त्वाचं कारण ठरला. मात्र ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांना 'द केरळ स्टोरी'ला मिळालेलं यश हा एक धोकादायक ट्रेंड असल्याचं म्हटलं आहे. 

नसरुद्दीन शाह नेमकं काय म्हणाले आहेत?

नसरुद्धीन शाह यांनी 'द केरळ स्टोरी'वर आपलं मत मांडलं आहे. भीड, अफवा, फराज सारखे चित्रपट चालले नाहीत, मात्र 'द केरळ स्टोरी'ला मिळालेलं यश हे आश्चर्य असल्याचं ते म्हणाले आहेत. "भीड, अफवा, फराजसारखे चांगले चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. कोणीही हे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेलं नाही. मात्र लोक द केरळ स्टोरी पाहण्यासाठी चित्रपटगृहात जात आहेत. मी हा चित्रपट पाहिलेला नाही आणि तो पाहण्याचा माझा कोणताही हेतू नाही. कारण या चित्रपटाबद्दल मी बरंच काही ऐकलं आहे".

"हा एक धोकादायक ट्रेंड"

नसरुद्धीन शाह यांनी यावेळी हा एक धोकादायक ट्रेंड असल्याचं सांगितलं. तसंच या ट्रेंडची तुलना नाझी जर्मनीशी केली आहे. "हा एक धोकादायक ट्रेंड आहे यात कोणतीही शंका नाही. आपण लोक नाझी जर्मनीच्या दिशेने वाटचाल करत आहोत. जिथे हिटलरच्या काळात सर्वोच्च नेत्याकडून चित्रपट दिग्दर्शक नेमले जात होते. जेणेकरुन ते चित्रपटांमध्ये सरकारची वाहवा करतील आणि त्यांनी देशवासियांसाठी काय केलं आहे हे दाखवतील. यहुदी समाजाची यावेळी बदनामी केली जात होती. जर्मनीच्या अनेक दिग्गज फिल्ममेकर्सनी देश सोडला आणि हॉलिवूडला निघून गेले. त्यांन तिथे जाऊन चित्रपट बनवले. आता भारतातही अशाच गोष्टी होत आहे. एकतर योग्य बाजूला राहा किंवा मग तटस्थ किंवा सत्तेच्या बाजूने".

दरम्यान नसरुद्धीन शाह यांनी यावेळी वेळेसोबत गोष्टी सुधारतील अशी अशा व्यक्त केली. ते म्हणाले की "द्वेषाचं हे वातावरण एक दिवस सर्वांना थकवणारं असेल आशा आहे. तुम्ही कधीपर्यंत द्वेष पसरवणार? मी आशा करतो की ज्याप्रमाणे हे सर्व अचानक सुरु झालं त्याप्रमाणे अचानक गायबही होईल". नसरुद्धीन शाह यांनी यासाठी वेळ लागेल हेदेखील यावेळी मान्य केलं.