मुंबई : चित्रपट क्षेत्रातील कारकिर्द फारशी चांगली राहिली नसली तरीही रुपेरी पडद्यावर कायम चर्चेत असणारं एक नाव म्हणजे अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) याचं. चित्रपटांच्या दुनियेत बॉबी अपयशी ठरला असला तरीही ओटीटी प्लॅटफॉर्मवर मात्र त्याला चांगलीच दाद मिळाली.
पाहता पाहता, हा अभिनेता पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आला. असा हा बॉबी हल्लीच अभिनेता अभय देओल म्हणजेच त्याच्या चुलत भावासोबत दिसला होता. बॉबी आणि अभय एके ठिकाणहून बाहेर पडताच तिथं काही गरीब मुलं आली आणि त्यांनी बॉबीला जणू घेरलंच.
मुद्दा असा, की तुम्हीआम्हीसुद्धा असं कोणी रस्त्यावरून जाताना साधं बाजुनीही गेलो तर नाकं मुरडतो. कोरोना काळापासून तर, या वागणूकीमध्ये बरीच भरही पडलेली आहे. पण, बॉबीनं तसं काहीच केलं नाही.
या मुलांना प्रेमानं जवळ घेत त्यांच्यासोबत फोटो काढले आणि त्यांच्या जीवनात काही आनंदाचे क्षण देऊ केले.
बॉबीची ही वर्तणूक पाहता, नेटकऱ्यांनाही त्याचं हे रुप भावलं. दरम्यान, बॉबी त्याच्या 'आश्रम' (Aashram) या वेब सीरिजमुळे प्रचंड लोकप्रिय झाला. सीरिजमध्ये त्यानं साकारलेली नकारात्मक भूमिकाही त्याला सकारात्मक प्रतिक्रिया देऊन गेली.