'मला फक्त सलमानमुळेच चित्रपसृष्टीत काम मिळतं असं नाही'

घराणेशाहीचा मुद्दा हा कलाविश्वात नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे. 

Updated: Apr 25, 2019, 03:15 PM IST
'मला फक्त सलमानमुळेच चित्रपसृष्टीत काम मिळतं असं नाही'  title=
अरबाज खान

मुंबई : घराणेशाहीचा मुद्दा हा कलाविश्वात नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे. करण जोहरपासून ते आलिया भट्टपर्यंत प्रत्येकावरच घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका झाल्याचं आजवर अनेकदा पाहायला मिळालं आहे. एखाद्या सेलिब्रिटी कुटुंबातील अनेक पिढ्या या कलाविश्वात स्थिरावल्याचं पाहात ठराविक कुटुंबालाही त्याचं श्रेय देण्यात येतं. पण, प्रत्येक वेळी कुटुंबातील अमुक एका व्यक्तीचा आपल्याला फायदा होईलच किंवा होतोच असं नाही ही महत्त्वाची बाब अभिनेता आणि दिग्दर्शक अरबाज खान याने स्पष्ट केली. 

'पीटीआय' या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना अरबाजने अत्यंत महत्त्वाची बाब सर्वांसमोर ठेवली. 'आतापर्यंत मी जवळपास ७० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या क्षेत्रात असेही काही लोक आहेत, ज्यांनी दोन चित्रपटांनंतर काम करणं सोडून दिलं आहे. मी जवळपास दोन दशकांहून अधिक काळ चित्रपटविश्वात सक्रिय आहे. इथे मी सलमानचा भाऊ आहे म्हणून मला कोणी काम देतं असं नाही', असं अरबाज म्हणाला. 

सलमानचा भाऊ असल्याचा फायदा अरबाजला त्याच्या कलाविश्वातील कारकिर्दीतही होत असावा असा अनेकांचाच समज. पण, तसं नसल्याचंच खुद्द अरबाजने स्पष्ट केलं. 'सलमानचा भाऊ असल्यामुळे एखाद दुसऱ्या चित्रपटाचा प्रस्ताव आपल्याला मिळतो. पण, कारकिर्द मात्र आपली आपल्यालाच घडवायला लागते', ही बाब त्याने वृत्तसंस्थेशी संवाद साधताना मांडली. आपल्याला आपल्या कर्तृत्त्वाच्या बळावर या कलाविश्वात काम मिळालं, मग ते चांगलं असो किंवा वाईट. पण, 'सरतेशेवटी माझं अस्तित्वं हे माझ्या बळावर आहे आणि मी इथे माझ्या पायांवर उभा आहे', असंही अरबाज म्हणाला. 

हिंदी कलाविश्वात अरबाज खानच्या कुटुंबालाही बराच आदर आहे. ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांचा तो मुलगा. अब्बास- मस्तान यांच्या 'दरार' या चित्रपटातून त्याने अभिनय विश्वात पदार्पण केलं होतं. अभिनयामागोमाग 'दबंग' या चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाच्या निमित्ताने त्याने अनुक्रमे चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. एकंदरच या कलाविश्वात त्याने स्वत:च्या बळावर वेगळी अशी ओळख प्रस्तापित केली.