'मी विमानावरुन थेट हॉट एअर बलूनवर उडी मारली होती,' अक्षय कुमारने सांगितला सर्वाधिक धोकादायक स्टंट, 'मी वेडा होतो'

अक्षय कुमारच्या 'बडे मियाँ, छोटे मियाँ' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असणार आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 26, 2024, 04:46 PM IST
'मी विमानावरुन थेट हॉट एअर बलूनवर उडी मारली होती,' अक्षय कुमारने सांगितला सर्वाधिक धोकादायक स्टंट, 'मी वेडा होतो' title=

बॉलिवूडचा सर्वात मोठा अॅक्शन हिरो म्हणून अक्षय कुमारला ओळखलं जातं. आतापर्यंतच्या आपल्या करिअरमध्ये अक्षय कुमारने अनेक स्टंट केले आहेत. अक्षय कुमारने नुकतंच आपल्या सर्वात धोकादायक स्टंटबद्दल खुलासा केला असून, तेव्हा आपण वेडे होतो असं म्हटलं आहे. हा सीन करताना अक्षय कुमारने आधी विमान पकडण्यासाठी रनवेवर धाव घेतली होती. यानंतर त्याने विमानावरुन हॉट एअर बलूनवर उडी मारली होती. अक्षयने आपण कोणत्याही सुरक्षेविना हा स्टंट केल्याचं सांगताना तेव्हा आपण फार वेडे होतो असं म्हटलं आहे. 

अक्षय कुमारच्या 'बडे मियाँ, छोटे मियाँ' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असणार आहे. यादरम्यान संवाद साधताना अक्षय कुमारला त्याच्या करिअरमधील सर्वात कठीण स्टंटबद्दल विचारण्यात आलं. तसंच वयाच्या 56 व्या वर्षी असे स्टंट करताना विचार करतोस का? हा प्रश्नही विचारण्यात आला. 

अक्षय कुमारने यावेळी सांगितलं की, "मी जेव्हा विमानावर उभा राहिलो होतो, तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अॅक्शन सीन होता. मला धावपट्टीवर धावणारं विमान पकडायचं होतं हे विमान पकडल्यानंतर मला त्यावर जाऊन उभं राहायचं होतं. यानंतर हॉट एअर बलूनवर उडी मारायची होती. मला वाटतं तो तेव्हाचा वेडेपणा होता. मी वेडा होतो. मी एकदा देवाकडे आयुष्याची चाचपणी केली आणि नशिबाने सुरक्षित राहिलो. मी वाचण्याची 30 आणि न वाचण्याची 70 टक्के संधी होती. ते फार कठीण होतं आणि मी पुन्हा करणार नाही".

अक्षय कुमार आपले स्टंट बॉडी डबल न वापरता स्वत: करण्यासाठी ओळखला जातो. यावेळी त्याने खुलासा केला की, अॅक्शन चित्रपट करण्याआधी तो संपूर्ण  क्रूच्या सुरक्षेची तपासणी करतो. "मला आता पुन्हा तो मूर्खपणा पुन्हा करु नको असं सांगण्यात आलं आहे. मी आता समजूतदार झालो आहे. आता असे कोणतेही स्टंट करण्याआधी मी विचार करतो. आता सुरक्षा प्राथमिकत आहे. यापूर्वी जेव्हा आम्ही हेलिकॉप्टरमधून उडी मारत असू, तर खाली गाद्या नसायच्या. आम्ही फक्त जमिनीवर उडी मारून आपले गुडघे किंवा काहीतरी मोडत असू. ते फार वाईट होतं. पण आता, सुरक्षा ही महत्वाची ठरली आहे. याशिवाय विमा आहेत. याक्षणी माझे काम स्वतःचे रक्षण करणे आणि स्वतःला निरोगी ठेवणे आहे," असं अक्षय कुमारने सांगितलं.

'बडे मियाँ, छोटे मियाँ' चित्रपटाची निर्मिती जॅकी भगनानीने केली आहे. यावेळी त्याने जॉर्डनमध्ये शुटिंग करताना अक्षयच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचा खुलासा केला. "मला माहिती आहे की, अक्षय कुमार हे सांगणार नाही. पण जॉर्डनमध्ये शुटिग करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. जर इतर कोणी असतं तर शुटिंग थांबवलं असतं. पण त्याने बँडेज लावून शुटिंग सुरु ठेवलं," असं जॅकीने सांगितलं.

दरम्यान अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा 'बडे मियाँ, छोटे मियाँ' चित्रपट 10 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मल्याळम स्टार पृथ्वीराज विलेनच्या भूमिकेत आहे.