मुंबई : एकिकडे कोरोना व्हायरसचीच चर्चा सुरु होत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर अचानकत अभिनेता आमिर खान आणि त्याचं 'चीन कनेक्शन' सर्वांसमोर आलं आहे. सहसा आपलं खासगी आयुष्य गुलदस्त्यात ठेवणं पसंत करणारा आमिर चक्क त्याच्या आणि किरण रावच्या नात्याविषयी सांगत असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
एका चीनी पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत त्याने किरणशी सुरुवातीची ओळख, पहिल्या पत्नीसोबतच्या नात्यातील वादळ अशा गोष्टींवर भाष्य केलं होतं. किरणसोबत आपली पहिली भेट ही 'लगान' (२००१) या चित्रपटाच्या सेटवर झाल्याचंही आमिरने या मुलाखतीत सांगितलं.
'मी किरणला आधीच भेटलो होतो.... जेव्हा मी लगान हा चित्रपट करत होतो. ती काही सहाय्यक दिग्दर्शकांपैकी एक होती. त्यावेळी आमच्यामध्ये असं कोणतं नातं नव्हतं. आम्ही तर चांगले मित्रही नव्हतो. ती त्यावेळी चित्रपटाच्या युनिटमधील एक व्यक्ती होती. हे सर्व तेव्हा... जेव्हा माझा घटस्फोट झाला आणि मी तिला पुन्हा भेटलो', असं सांगत आमिरने त्यांचं नातं पुढे कसं गेलं याचा उलगडा केला.
'त्या काहीशा आघात झालेल्या परिस्थितीमध्ये मला तिचा फोन आला होता. जवळपास अर्ध्या तासासाठी मी तिच्याशी बोललो. जेव्हा मी फोन ठेवला, तेव्हा तिच्याशी संवाद साधल्यानंतर मला किती आनंद झाला, याची अनुभूती झाली. पुढे आम्ही दोघांनी डेट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लग्न होण्यापूर्वी जवळपास वर्षभरासाठी आम्ही एकत्र राहिलो. एक साथीदार म्हणून मी किरणशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाही करु शकत नाही. तिचं असणंच माझ्यासाठी एका वरदानाप्रमाणे आहे', असं म्हणत त्याने अतिशय सुरेखपणे किरण सोबतचं त्याचं नातं सर्वांपुढे आणलं होतं.
मिस्टर परफेक्शनिस्टच्या या परफेक्ट नात्याचा अनेकांचा हेवा वाटतो. किरणची आमिरला त्याच्या कारकिर्दीमध्येही साथ असते. शिवाय अनेक समाजोपयोगी कामांमध्येही त्याला किरणची साथ असते.