मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट, अभिनेता आमिर खान याच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटावर संकट घोंगावताना दिसत आहे. एकाएकी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात येत आहे. त्यातच #BoycottLaalSinghChaddha ही सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आल्यानं चित्रपटाविषयी नकारात्मक वातावरण तयार होताना दिसत आहे.
आपल्या चित्रपटाविषयी येणाऱ्या या प्रतिक्रिया पाहता खुद्द आमिरनंच त्यावर मौन सोडलं आहे. खुद्द आमिरलाही या नकारात्मक वातावरणाची चिंता वाटू लागली आहे. याविषयी आपली भूमिका मांडताना आमिर म्हणाला, 'एक चित्रपट साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. फक्त कलाकारच नव्हे, तर अनेकांच्या भावना चित्रपटाशी जोडलेल्या असतात. चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही तो पसंत करा किंवा त्यावर नाराजी व्यक्त करा ती सर्वस्वी तुमचीच भूमिका असेल. पण, तो प्रदर्शित होण्यापूर्वी अशा सर्व गोष्टी पाहून वाईट वाटतं.'
मला मान्य आहे, की काही लोकांना असं वाटतं की माझं या देशावर प्रेम नाही. मी त्यांना इतकंच सांगू इच्छितो की त्यांना जसं वाटतं तसं मुळीच नाहीये. माझं या देशावर आणि आपल्या लोकांवर फार प्रेम आहे, असं म्हणत आमिरनं त्याच्याविरोधात सूर आळवणाऱ्या सर्वांनाच आपल्या चित्रपटावर बंदी न आणण्याची मागणी केली.
एक कलाकार म्हणून आमिरनं आपली भूमिका स्पष्ट करत अनेकांच्या मनात असणारे पूर्वग्रह दूर करण्याचा प्रयत्न केला.