मुंबई : सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक असणाऱ्या सलमान खानच्या अकाऊंटवरुन नेहमीच काही अफलातून गोष्टी पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळते. सध्याच्या घडीला 'दबंग ३' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असणाऱ्या सलमानने असाच एक रंजक व्हिडिओ सर्वांच्या भेटीला आणला आहे. याच व्हिडिओची चर्चा सध्या सुरु असून, कमेंट बॉक्समध्ये त्यावरील प्रतिक्रियाही पाहता येत आहेत.
सलमानने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक चिमुरडी त्याच्यासमोर भाषण देताना दिसत आहे. सहसा अनोळखी किंवा बाहेरच्या कोणा व्यक्तीसमोर लहान मुलं मनमोकळेपणाने बोलत नाहीत. पण, ही मुलगी मात्र मोठ्या आत्मविश्वासाने 'दबंग' खानपुढे उभी असून खणखणीत आवाजात भाषण देत आहे.
तिचा हा मराठी बाणा खरंच वाखाणण्याजोगा आहे. देशाच्या स्वतंत्र्यासाठी लढा देणाऱ्या काही व्यक्तींची नावं घेताना तिच्या चेहऱ्यावरील भावना आणि हावभाव पाहण्याजोगे आहेत. शालेय स्पर्धांमध्ये वक्तृत्व स्पर्धेसाठी ज्याप्रमाणे एखादं भाषण तयार केलं जातं, अगदी तशाच प्रकारचं भाषण, विशेष म्हणजे मराठी भाषेतील भाषण ती सलमानसमोर सादर करत आहे.
‘इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव कित्येकांनी हौतात्म्य पत्करलं', असं भाषणाच्या माध्यमातून म्हणत आपण प्रजासत्तात दिन का साजरा करतो, याचंही कारण ती स्पष्ट करताना दिसत आहे. तिचं हे देशप्रेम आणि आत्मविश्वास पाहता काही मिनिटांच्या या भाषणानंतर सलमानही तिच्या प्रशंसनार्थ टाळ्या वाजवत तिला दाद देताना दिसत आहे.
'बच्चे बच्चे मे भारत' अशा कॅप्शनसह रुपेरी पडद्यावरच्या 'भारत'ने हा व्हिडिओ शेअर केला आहे. चित्रीकरण किंवा मग सहजच फिरण्यासाठी गेलं असता एका खेडेगावातील हा व्हिडिओ असल्याचं लक्षात येत आहे.