नवी दिल्ली: बॉलीवूड अभिनेता आयुषमान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यप हिला स्तनांचा कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले आहे. ताहिराने स्वत: ही माहिती दिली. हा कॅन्सर प्राथमिक अवस्थेत असल्याचेही तिने सांगितले.
ताहिराने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कीम कर्दाशिअनशी स्पर्धा करण्याची माझी संधी हुकली आहे. काही दिवसांपूर्वी माझ्या उजव्या स्तनामध्ये डीसीआयएस झाल्याचे निदान करण्यात आले. हा शून्य अवस्थेतील कॅन्सर आहे. यामध्ये कॅन्सर विशिष्ट भागापुरता मर्यादित असतो. यासाठी ताहिरावर मॅस्टेक्टोमी करण्यात आली आहे. सध्या ताहिराची प्रकृती स्थिर आहे.
आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ताहिराने महिलांना कॅन्सरविषयी सावधान राहण्यास सांगितले आहे. त्यासाठी महिलांनी नियमितपणे स्वत:ची तपासणी करावी. या अडथळ्यामुळे माझे संपूर्ण जीवन बदलून गेले आहे. मनुष्याला न करता येण्याजोगे काहीच नसते. सर्व वयाच्या महिलांनी याविषयी जागरुक असले पाहिजे. कॅन्सरविषयी जागरुकता, स्वत:वर प्रेम आणि झुंजण्याची प्रेरणा मिळावी यासाठी मी हा अनुभव शेअर केल्याचे ताहिराने सांगितले.