Rupali Ganguly on Casting Couch: 'अनुपमा' कार्यक्रमामुळे रुपाली गांगुली (Rupali Ganguly) हे नाव आता घराघरात पोहोचलं आहे. अनुपमाने रुपाली गांगुलीला पुन्हा एकदा प्रसिद्धी मिळवून दिली आहे. याआधी 'साराभाई Vs साराभाई' (Sarabhai vs Sarabhai) शोमधील आपल्या मोनिशा भूमिकेमुळे रुपाली गांगुलीला प्रसिद्धी मिळाली होती. दरम्यान नुकतंच रुपाली गांगुलीने इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचवर भाष्य केलं आहे. इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचमुळेच आपण फिल्म इंडस्ट्रीतील करिअर सोडलं असा खुलासा नुकताच तिने केला आहे.
Pinkvilla ला दिलेल्या मुलाखतीत, रुपाली गांगुलीने त्यावेळी कास्टिंग काऊच प्रचंड सक्रीय असल्याने आपण जाणुनबुजून फिल्म इंडस्ट्रीचा भाग न होण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं. रुपाली गांगुली म्हणाली की, "मी चित्रपटात फार चांगली कामगिरी करु शकले नाही. मीच जाणुनबुजून इंडस्ट्रीचा भाग न होण्याचा निर्णय घेतला कारण त्यावेळी कास्टिंग काऊच सुरु होतं. काहींना कदाचित हा अनुभव आला नाही, पण माझ्यासारख्यांना हा अनुभव आला आणि ही निवड न करण्याचं ठरवलं. तुम्ही फिल्मी कुटुंबातील असल्याने अपयशी म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं".
यावेळी रुपाली गांगुलीने कशाप्रकारे अनुपमा कार्यक्रमाने आपल्याला फेम मिळवून दिलं याबद्दल सांगत आभार मानले. ती म्हणाली की, "मला त्यावेळी फार छोटं वाटत होतं, पण आता फार लहान वाटत आहे. मला फार अभिमान वाटत आहे. मला नेहमी ज्याची आशा होती ते यश अनुपमाने मिळवून दिलं आहे. अनुपमा माझ्यासाठी आयुष्य बदलवून टाकणारा अनुभव आहे. मी देव आणि माझ्या वडिलांची खूप आभारी आहे. त्यांनीच हे केलं आहे".
रुपाली गांगुली काही दिवसांपूर्वी सह-कलाकार सुधांशू पांडेसह वाद झाल्याच्या चर्चांमुळे चर्चेत होती. सुधांशू पांडे कार्यक्रमातून बाहेर पडला असून आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुनही त्याची घोषणा केली आहे. यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.