'असे चित्रपट करू नकोस'; बॉबी देओलच्या आईनं 'ॲनिमल' पाहताच दिला सल्ला

Bobby Deol's reaction on Animal : मुलगा बॉबी देओलचा 'ॲनिमल' पाहिल्यानंतर आई प्रकाश कौरनं दिला हा सल्ला.

दिक्षा पाटील | Updated: Dec 7, 2023, 11:45 AM IST
'असे चित्रपट करू नकोस'; बॉबी देओलच्या आईनं 'ॲनिमल' पाहताच दिला सल्ला title=
(Photo Credit : Social Media)

Bobby Deol's reaction on Animal :  बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील कलाकारांच्या सगळ्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या चित्रपटात अभिनेता बॉबी देओलची खलनायकाची भूमिका असली तरी प्रेक्षकांना त्याचा स्क्रिनटाईम आणखी हवा होता. तर त्याच्या करिअरमध्ये ही भूमिका महत्त्वाची आणि सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरली आहे. एकीकडे त्याच्या अभिनयाची स्तुती होत आहे तर दुसरीकडे त्याच्या आईनं त्याला असे चित्रपट न करण्याचा सल्ला दिला आहे. 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉबी देओलनं त्याच्या या चित्रपटावर घरच्यांनी कशी प्रतिक्रिया दिली हे सांगितलं आहे. त्याच्या पत्नीला आणि मुलाला हा चित्रपट प्रचंड आवडला. तर त्याची आई प्रकाश कौर हा चित्रपट पाहू शकल्या नाही. बॉबीनं सांगितलं की हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे आणि त्याची आई असे चित्रपट पाहू शकत नाही. त्याविषयी बोलताना बॉबी देओल म्हणाला की ज्या प्रकारे 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटात तो त्याच्या वडिलांच्या निधनाचा सीन पाहू शकत नव्हता, त्याच प्रमाणे त्याची आई 'ॲनिमल' मध्ये त्याच्या निधनाचा सीन पाहू शकत नव्हती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'ॲनिमल' पाहत असताना प्रकाश कौर या बॉबी देओलला म्हणाल्या, तू असे चित्रपट करत जाऊ नकोस, माझ्याकडून पाहिलं जात नाही. आईला असं भावूक झालेलं पाहून बॉबी त्यांना समजवत म्हणाला, बघ मी तुझ्या समोर आहे. या चित्रपटात मी फक्त ती भूमिका साकारली आहे. बॉबी देओल पुढे म्हणाला की त्याची आई हा चित्रपट पाहू शकली नसली, तरी चित्रपटाला मिळालेल्या यशानं तिला खूप आनंद झाला आहे. 

पुढे बॉबी देओल म्हणाला की आतापर्यंत धर्मेंद्र आणि सनी देओल यांनी हा चित्रपट पाहिलेला नाही, मात्र, कुटुंबातील इतर सदस्यांनी चित्रपट पाहिुला आहे. त्यानं सांगितलं की संपूर्ण कुटुंबानं त्याला पाठिंबा दिला आहे. कुटुंबानं त्याच्यावर विश्वास दाखवला होता आणि आतापर्यंत ते प्रतिक्षा करत होते की बॉबीला अशी काही भूमिका मिळेल. 

हेही वाचा : 'या' 7 बिग बजेट चित्रपटांना मागे टाकत रणबीरच्या 'ॲनिमल'नं रचला नवा रेकॉर्ड

दरम्यान, 'ॲनिमल' विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटानं नवा रेकॉर्ड ब्रेक करत पठाण आणि 'पठाण', 'गदर 2', 'केजीएफ 2' (हिंदी), 'बाहुबली' 2 (हिंदी), 'दंगल', 'संजू' आणि 'टाइगर जिंदा है' या चित्रपटांना 250 कोटींचा आकडा पार करण्यात मागे टाकलं आहे. रणबीरच्या या चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर 312.96 कोटींची कमाई केली. तर वर्ल्ड वाईड चित्रपटानं 500 कोटींची कमाई केली आहे.